बेळगाव लाईव्ह : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीसाठी दुष्काळी मदत जाहीर करण्याची मागणी होत होती.
दरम्यान राज्य सरकारच्यावतीने बेळगाव जिल्ह्याला दुष्काळी मदत जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील २६८७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी निधीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली.
आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कि, राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यासाठी २४७ कोटी रुपयांची दुष्काळी मदत जाहीर केली आहे.
यापूर्वी २००० रुपये याप्रमाणे ६९.५२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित २४७ कोटी रुपये नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात विविध ठिकाणी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १४५ गावांमध्ये 160 टँकर याप्रमाणे दररोज ६२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या जनावरांच्या चाराटंचाईसाठी उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्ह्यात जनावरांसाठी सहा चारा बँका उघडण्यात आल्या आहेत. यापैकी अथणी तालुक्यातील ककमरी, अनंतपुर, तेलसंग, चिक्कोडी तालुक्यातील कडकोळगेट, रायबाग तालुक्यातील बुदिहाळ आदी ठिकाणी चारा बँक उघडण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.