बेळगाव लाईव्ह/सांबरा महालक्ष्मी यात्रा विशेष:१८ वर्षांनंतर बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावात श्री महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ मे २०२४ ते दि. २२ मे २०२४ या कालावधीत हि यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भव्य रथजोडणी करण्यात आली असून तब्बल चार दिवस देवीचा रथोत्सव आयोजिण्यात आला आहे.
शक्ती आणि भक्तीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या रथोत्सवाचे सांबरा गावात अनोखे असे वैशिष्ट्य आहे. यात्रा कमिटी, हक्कदार, देवस्थान पंच कमिटी, ग्रामस्थ आणि रथजोडणीसाठी विशेष परिश्रम घेणारे सुतार बंधू यांच्या परिश्रमातून सांबरा गावचा पूर्वापार चालत आलेला रथ सुशोभित करण्यात आला आहे.
सांबरा गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री दुर्गादेवी मंदिर परिसरात रथजोडणीचे कामकाज तब्बल सहा महिने सुरु असून १९५० साली जोडण्यात आलेला रथ परंपरेनुसार यंदा होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेतही वापरण्यात येणार आहे.
रथजोडणीसाठी मनुष्यबळाचे नियोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असणाऱ्या रथ जोडणीच्या कामासाठी ग्रामस्थांना दिवस ठरवून देण्यात आले होते. टोकन पद्धतीचा अवलंब करून ठराविक दिवशी सेवेदाखल ग्रामस्थांनी सुतार बंधूंना सहकार्य केले.
या रथाची उंची ६० फूट असून कळस आणि मोरासहित ११ आंखणी असा हा रथ विविध वैशिष्ट्यांनी सजवला गेला आहे. रथाच्या एका आंखणात सुमारे ४८ खांब असे एकूण ३०८ खांब असलेला हा भव्य असा रथ आहे. विविध देवदेवतांच्या प्रतिमांचा समावेश असलेला हा रथ अष्टकोनी स्वरूपातील आहे.
विशेष म्हणजे या रथाला सहा चाके असून बेळगाव जिल्ह्यातील अशा वैशिष्ट्यांचा समावेश असलेला हा एकमेव रथ आहे. १९५० साली तत्कालीन देवस्थान कमिटी, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या सल्ल्यानुसार बनविण्यात आलेला हा रथ आजही परंपरागत याच यात्रेसाठी वापरण्यात येत आहे.
यंदा होणाऱ्या यात्रेसाठी नव्या तंत्रज्ञानानुसार रथात आवश्यक ते बदल करण्यात आले असून उर्वरित रथाची शास्त्रोक्त पद्धतीने गरजेनुसार डागडुजी करण्यात आली आहे. या गोष्टी वगळता जो पूर्वापार यात्रेसाठी रथ वापरण्यात आला आहे तोच रथ या यात्रेसाठी वापरण्यात येत आहे.
सांबरा गावात होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेदरम्यान मंगळवारपासून रथोत्सवाला सुरुवात झाली असून तब्बल चार दिवस संपूर्ण गावात रथोत्सव होणार आहे. गावाचा परीघ हा हमचौक असल्याने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चोहोबाजुंच्या ग्रामस्थांना रथोत्सवात सहभागी होता यावे, संपूर्ण गावात महालक्ष्मी रथोत्सवाचा सोहळा अनुभवता यावा यादृष्टीकोनातून चार दिवस गावातील कानाकोपऱ्यात रथ फिरविण्यात येणार आहे.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीचा व्हन्नाट आणि रथोत्सव हे दोन सोहळे डोळ्याचे पारणे फेडणारे ठरणार आहेत. महालक्ष्मी गदगेचे ठिकाण आणि आकर्षक, भव्य आणि अनोख्या पद्धतीचा रथ हा भाविकांचे लक्ष वाढणारा ठरत आहे.