बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन वर्षांमध्ये बेकायदेशीररित्या दुकाने थाटून बसलेल्या भाडेकरुंवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता दोन वर्षानंतर पुन्हा मनपा अधिकाऱ्यांना जाग आली असून बेकायदेशीर भाडेकरूंवर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल विभागाच्या नूतन उपायुक्तांच्या आदेशानुसार महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, चंद्रू मुरारी, सुरेश आलूर आदींच्या उपस्थितीत सीबीटी येथील सहा दुकानांना बुधवारी टाळे ठोकल्यामुळे एकच खळबळ उडाली.
शहरातील महानगरपालिकेची विविध दुकाने लिलाव करण्यात आली. मात्र पूर्वीच्या भाडेकरुंनी कब्जा सोडण्यास दिरंगाई केली. काहीजणांनी न्यायालयात धाव घेऊन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर काहीजणांनी 4 ते 6 महिन्यांचे भाडेच दिले नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या महसूल विभागाने अशा भाडेकरुंवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बेकायदेशीर दुकाने थाटलेल्या भाडेकरुंना चांगलाच दणका बसला आहे.
महानगरपालिकेची दुकाने पूर्वीच्याच भाडेकरुंनी बेकायदेशीरपणे कब्जात ठेवली होती. भाडेही नाही आणि दुकान सोडण्यासही तयार नाहीत. यामुळे महानगरपालिकेने आता अशा भाडेकरुंवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून बेकायदेशीर दुकाने थाटून बसलेल्या साऱ्यांनाच आता दणका देण्यात येणार आहे, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. महात्मा फुले मार्केट, कोलकार मार्केट येथीलही काही दुकानदारांनी दुकाने सोडण्यास टाळाटाळ केली आहे. सदर दुकानांचा लिलाव होऊनही पूर्वीचेच भाडेकरू दुकाने थाटून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आता महानगरपालिकेने त्याविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.
तसेच भाडेकरुंनी थकीत भाडे भरले नाही तर आठ दिवसांत त्यांच्या दुकानांनाही टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील काही दुकानगाळे लिलाव केले होते. लिलाव होऊनही संबंधितांना दुकाने देण्यात आली नव्हती. मात्र आता नव्याने लिलावात दुकाने घेतलेल्या भाडेकरुंना दुकाने कब्जात देण्यात येणार आहेत.