बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे सार्वजनिक वाचनालय बेळगावतर्फे येत्या गुरुवार दि. 18 ते शनिवार दि. 20 जानेवारी 2024 या कालावधीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शैलीदार वक्ते व नामवंत संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या स्मृति प्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर रोड, गोवावेस बेळगाव येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये दररोज दररोज सायंकाळी 5:30 वाजता या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन केले जाईल. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी 18 जानेवारी रोजी साहित्यिक व गीतकार प्रा. प्रवीण दवणे (ठाणे) यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.
यावेळी त्यांचे ‘दीपस्तंभ : जनातले मनातले’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर 19 जानेवारी रोजी गोव्याचे शिवाजीराव देसाई यांचे ‘छ. शिवराय आणि आजचा युवक’ या विषयावर व्याख्यान होईल.
तसेच दि. 20 जानेवारी रोजी डाॅ. एम. डी. दीक्षित यांचे ‘बदलती जीवनशैली आणि हृदयविकार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सदर व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून नागरिकांनी बहुसंख्येने व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालय बेळगाव ने केले आहे.