belgaum

येळ्ळूर शाळेची ऐतिहासिक झेप, मराठी मॉडेल शाळेला KPS दर्जा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेने शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत कर्नाटक सरकारकडून कर्नाटक पब्लिक स्कूल (KPS) चा दर्जा प्राप्त केला आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेसाठी ही अभिमानास्पद आणि ऐतिहासिक उपलब्धी मानली जात असून, 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून शाळेत कर्नाटक पब्लिक स्कूलच्या नव्या पर्वाचा शुभारंभ करण्यात आला.

या विशेष सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या. माजी एसडीएमसी अध्यक्ष डी. जी. पाटील, उत्तम खेमणाकर, माजी अध्यक्षा रूपा धामणेकर तसेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सचिव आनंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून नव्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

शाळेच्या प्रारंभोत्सवाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांची गावातून ट्रॅक्टरमधून प्रभातफेरी काढण्यात आली. फुले आणि रंगीत खडूंचे बॉक्स देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केक कापून नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले.

 belgaum

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व समाजसेवक राजेंद्र ओमाना धामणेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

कर्नाटक पब्लिक स्कूलचा दर्जा मिळाल्यामुळे आता एलकेजीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली आणि मोफत उपलब्ध होणार आहे. तसेच द्विभाषिक शिक्षण पद्धती सुरू होत असल्याने यंदा एलकेजी, यूकेजी आणि पहिलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

यावेळी आनंद पाटील, डी. जी. पाटील, उत्तम खेमणाकर आणि एसडीएमसी उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेला मिळालेल्या नव्या दर्जामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दारे खुली झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात सौ. दिव्या संदीप कुंडेकर यांनी शाळेच्या यशामागील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य, एसडीएमसी सदस्य, माजी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मुख्याध्यापक आर. एम. चलवादी यांनी केले. सूत्रसंचालन ए. वाय. मेणसे, स्वागत मेघा देसाई तर आभार प्रदर्शन एस. बी. पाखरे यांनी केले.

ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेला मिळालेला कर्नाटक पब्लिक स्कूलचा दर्जा हा केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण येळ्ळूर गावाच्या शैक्षणिक वाटचालीतील अभिमानाचा क्षण ठरला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.