Thursday, May 23, 2024

/

माजी महापौर विजय मोरे यांचे ‘असे हे’ आगळे व्रत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री अतिउत्साह आणि बेदरकारपणामुळे अपघात ठरलेले असतात हे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे गेल्या 9 वर्षापासून एक आगळे व्रत आचरत आहेत. हे व्रत म्हणजे शहरवासीय नववर्षाच्या स्वागतामध्ये दंग असताना मोरे मात्र सामाजिक बांधिलकी जपत बिम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्तांच्या हितार्थ त्यांना जीवदान देण्यासाठी धडपडत असतात.

31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टची रात्र म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे उत्साहाने स्वागत करण्याची रात्र असली तरी अति मद्यपान, अपघात आदींमुळे त्या उत्साह -आनंदाला गालबोट लागण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. सर्वजण नववर्षाच्या स्वागतामध्ये गर्क असल्यामुळे अशावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या अपघातग्रस्तांची कुचंबना होऊ नये, त्यांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे गेल्या 9 वर्षांपासून झटत आहेत.

दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री 12 वाजता नववर्षाचे झटपट स्वागत केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपणारे विजय मोरे तडक सिव्हिल हॉस्पिटलचा कॅज्युलिटी विभाग गाठतात. त्या ठिकाणी ते नववर्षाच्या स्वागताच्या धुंदीत अपघातग्रस्त होऊन येणाऱ्या रुग्णांकडे जातीने लक्ष देऊन त्यांना व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहिल्यानंतर दोन-तीन वाजता घरी परतत असतात.

 belgaum

यंदाही काल रात्री 12 नंतर माजी महापौर विजय मोरे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ठाण मांडून होते. उपलब्ध माहितीनुसार काल रात्री छ. शिवाजी उद्यान टिळकवाडीतील अरुण थिएटर कॉलेज रोड हिंडलगा अशा दहा-बारा ठिकाणी अपघात झाले असून त्यामध्ये दोघा तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातांमधील जखमी आणि गंभीर जखमींना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आज पहाटेपर्यंत विजय मोरे यांची धडपड सुरू होती.

आज पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास छ. शिवाजी उद्यान येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाला विजय मोरे यांनी तातडीने केएलई इस्पितळात दाखल करण्याची व्यवस्था केली. मोरे यांच्या या धडपडीमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघा जणांना वेळेत उपचार उपलब्ध होण्याद्वारे त्यांचे प्राण वाचले आहेत, हे विशेष होय.More

यासंदर्भात बेळगाव लाईव्हने माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या 9 वर्षापासून दर 31 डिसेंबरच्या रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या आपल्या जनहितार्थ कार्याची माहिती दिली. तसेच आपले आयुष्य हे अनमोल आहे, ते आपण जपले पाहिजे. विशेष करून युवा पिढीने नववर्षाच्या स्वागतानिमित्त मौजमजा करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.

आपल्या घरच्यांचा विचार करावा. आपले आई वडील घरी वाट पाहत आहेत हे लक्षात ठेवावे. बेभान वाहन चालवणे, वाहनांवरून जाताना हुल्लडबाजी करणे वगैरेंसारखे गैरप्रकार करू नयेत. आपला जीव लाखमोलाचा आहे हे लक्षात ठेवून तो धोक्यात न घालता साध्या सोप्या पद्धतीने नववर्षाचे आनंदात स्वागत करावे, असा संदेश माजी महापौर विजय मोरे यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.