Sunday, June 16, 2024

/

१ जून पासून वाहन परवाना मिळविणे होणार सुलभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : देशात १ जूनपासून वाहन परवाना मिळविणे अतिशय सुलभ होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे वाहन परवाना मिळविणे अधिक सुकर होणार असून परवाना मिळवण्याच्या किचकट प्रक्रियेला आता रामराम ठोकता येणार आहे.

वाहतूक परवाना मिळविण्यासाठी सुरुवातीला अर्जदाराला एक परवाना काढण्यासाठी विविध एजन्सीना भेट द्यावी लागते, अनेक फॉर्म्स भरावे लागतात. अशा गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेकदा गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील वाढू शकते; ज्याचा दुष्परिणाम हा भारतातील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्यावर होऊ शकतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बाब नागरिकांची सुरक्षा आणि परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. हे बदल १ जूनपासून होणार आहेत.

 belgaum

१. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात. खासगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रे देण्यात येतील; ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील.

२. वैध परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, अल्पवयीन चालक पकडला गेल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते.

३. परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्येदेखील सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याबद्दलची यादी आधीच अर्जदाराला देण्यात येईल.

४. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून, आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे.

५. असे बदल करण्यात आले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in/ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.