Sunday, June 16, 2024

/

बेळगावात मिळताहेत शिवकालीन युद्ध कलेचे धडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह:सव्यासाची गुरुकुलम गारगोटी, श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिर बेळगाव आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव, महाद्वार रोड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुला -मुलींसाठी आयोजित शिवकालीन युद्ध कलेचे व भारतीय व्यायामाचे प्रशिक्षण देणारे शिबिर सध्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू असून येत्या 27 मे रोजी या शिबिराची भव्य सांगता होणार आहे, अशी माहिती श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपलेश्वर मंदिराचे  जनसंपर्क प्रमुख अभिजीत चव्हाण यांनी दिली.

श्री कपिलेश्वर मंदिराच्या नव्या तलावाच्या ठिकाणी गेल्या शुक्रवारी 17 मे पासून शिवकालीन युद्ध कलेचे व भारतीय व्यायामाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शिबिराच्या ठिकाणी भेट देणाऱ्या बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीशी चव्हाण बोलत होते. अभिजीत चव्हाण म्हणाले की, श्रीक्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर, सव्यासाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव महाद्वार रोड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी आम्ही मुला मुलींसाठी लाठीकाठी स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहोत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला आहे. सदर शिबिरात जवळपास 185 मुला -मुलींनी सहभाग दर्शवला आहे. या शिबिरात लखन गुरुजी यांच्या शिष्यांकडून शिबिरार्थींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. श्री कपिलेश्वर मंदिरातर्फे हे शिबिर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा भव्य असा सांगता समारंभ येत्या 27 मे रोजी आयोजित केला आहे. याप्रसंगी लाठीकाठीसह इतर प्रात्यक्षिकही सादर केले जाणार आहेत अशी माहिती देऊन समस्त बेळगावकरांनी या समारंभाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मंदिर जनसंपर्क प्रमुख अभिजीत चव्हाण यांनी केले.

 belgaum

शिवकालीन युद्ध कलेचे आणि भारतीय व्यायामाचे प्रशिक्षण देण्यासाठी गारगोटी (महाराष्ट्र) येथून आलेले सव्यासाची गुरुकुलचे युवा प्रशिक्षक ओम संतोष पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, या शिबिराचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून सदर शिबिर दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत चालते.

शिबिरात सूर्यनमस्कार दंड बैठका मारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या भारतीय व्यायामांसह लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला वगैरे शिवकालीन शस्त्र फिरवण्याची प्रशिक्षण दिले जात आहे.Kapileshwar

या व्यतिरिक्त राष्ट्राप्रती आपले कर्तव्य काय आहे? राष्ट्राप्रती आपलं समर्पण काय असलं पाहिजे? भारतभूमीत आपला जन्म झाला ते अहोभाग्य कसं आहे, थोडक्यात मुलांमध्ये राष्ट्रप्रेम कसे जागृत होईल या अनुषंगाने शिबिरात चिंतनही केले जाते. आजच्या आधुनिक युगात बंदुकी सारखी अनेक नवी शस्त्रे उदयास आली असली तरी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचा कसा प्रभावी उपयोग करता येतो हे या शिबिरात शिकवलं जातं. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी लाठीकाठी, तलवार, भाले, दांडपट्टा वगैरे शस्त्रांच्या गडावर स्वराज्याची निर्मिती केली. आज तलवार म्हटलं की शिवरायांची तर दांडपट्टा म्हटलं की बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण होते. त्यांची ती समर्पण, निष्ठा, त्याग आजच्या मुलांमध्ये यावी यासाठी अशी प्रशिक्षण शिबिरं भरवणे ही काळाची गरज आहे.Samarth

आजच्या एकंदर सामाजिक परिस्थितीत मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे अत्यावश्यक आहे. आज आपल्या देशाचा सर्व क्षेत्रात मोठा विकास होत आहे. मात्र कोणताही देश महासत्ता बनण्याचा विचार करत असेल तर तू फक्त भौतिक पातळीवर विकसित होऊन चालत नाही तर तो चारित्र्याच्या पातळीवर ही तितकाच विकसित होणे गरजेचे असते. त्यासाठी शिवरायांची फक्त श्री शिवजयंती साजरी करून चालणार नाही तर रोजच्या प्रत्यक्ष जीवनात आपण शिवरायांसारखे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे या अनुषंगाने शिबिरात प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण शिबिर गेल्या 17 मे पासून सुरू झाले असून ते 27 मे पर्यंत चालणार आहे. याव्यतिरिक्त आमचे मच्छे गावामध्ये देखील वर्ग सुरू असून त्या ठिकाणी सुमारे 20 मुले प्रशिक्षण घेत आहेत. अतिवाड येथे देखील प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

या पद्धतीने आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात भारतीय शस्त्र कलेचे प्रशिक्षण दिले जात आहे असे सांगून आमचे प्रमुख लखन जाधव गुरुजी युद्ध कलेमध्ये शस्त्र पारंगत आहेत. आम्ही त्यांचे शिष्य असून त्यांच्या मार्फत येथे आलो आहोत आम्ही कोणतेही मानधन घेत नाही. तसेच जर कोणी मानधन दिलं तर ते आम्ही गुरुकुलला समर्पित करतो. सव्यासाची गुरुकुलाचे प्रमुख केंद्र गारगोटी येथे असून तिथे 60 मुले कायमस्वरूपी शिकण्यासाठी असतात, अशी माहिती प्रशिक्षक ओम संतोष पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.