Friday, May 24, 2024

/

रौप्य महोत्सव साजरा करीत असलेली सुवर्ण लक्ष्मी सोसायटी*

 belgaum

(सुवर्ण व्यवसायात असलेल्या समाज बांधवांनी 7 डिसेंबर 1998 रोजी सुरू केलेल्या श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीचा रौप्य महोत्सव आज 17 डिसेंबर रोजी समारंभपूर्वक संपन्न होत आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख)

*बे* ळगाव शहराच्या विकासात अनेक संस्थांचा वाटा आहे, आज काही मल्टीस्टेट सहकारी संस्था महाराष्ट्र ,कर्नाटक आणि गोव्यात शाखा सुरू करून दिमाखाने कार्यरत आहेत. पण त्याचबरोबर अल्पशा भांडवलावर सुरू झालेल्या काही सोसायट्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत करित रौप्य महोत्सवाकडे वाटचाल केली आहे. अशा संस्थेमध्ये श्री सुवर्णलक्ष्मी सहकारी सोसायटीचा उल्लेख करावा लागतो.

हंस थिएटरचे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या आणि जायंट्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या उभारणीत कार्यरत असलेल्या मोहन कारेकर यांनी आपले मित्र विजय सांबरेकर यांच्या सहकार्याने समविचारी तरुण एकत्र करून १९९८ साली दैवज्ञ ब्राह्मण समाजातील गरजू लोकांसाठी एक संस्था सुरू करण्याचे ठरवले आणि त्यातूनच श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटी उदयास आली. याच काळात इतर समाजाच्या काही संस्थाही निर्माण झाल्या होत्या .त्यामुळे प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी सोसायट्या सुरू केल्या. त्यातीलच ही एक सोसायटी होय.

 belgaum

दैवज्ञ ब्राह्मण समाज तसा संख्येने मोठा नसला तरी व्यवसाय उद्योगात स्वतःला गुंतवून देऊन काम करणारा. त्यामुळेच अल्पशा भांडवलावर मर्यादित सभासद संख्येच्या बळावर, पण उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या सोसायटीने एकजुटीने कार्य करणारी व कारेकर सांबरेकर यांना मानणारी अनेक माणसे एकत्र आली आणि अल्पावधीतच ‘विश्वासू माणसे- विश्वासू सोसायटी’ हे संस्थेने स्वीकारलेले ब्रीदवाक्य यशस्वी झाले.
केवळ 400 सभासद आणि पाच लाख भाग भांडवलावर सुरू झालेल्या या सोसायटीची सभासद संख्या आता 9036 असून 24 लाखापर्यंतचे भाग भांडवल आहे. गुंतवणूक 5 कोटी 26 लाखाची असून ठेवीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. आज संस्थेकडे 17 कोटीच्या वर ठेवी असून नियमितपणे गरजूंनाही कर्जाचे वितरण केले जाते .आतापर्यंत 15 कोटी 37 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. अनेक सर्वसामान्यांना कर्ज देऊन त्याची नियमित वसुली करण्यात आल्यामुळे अनेकांच्या व्यवसाय- उद्योगाची वृद्धी झाली आहे. संस्थेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘ए’ मिळाला असून यंदा सभासदांना 18% डिव्हिडंट दिला आहे.

Suvarna laxmi
सुवर्णलक्ष्मी सोसायटीने आजवर केवळ आर्थिक व्यवसाय केला असे नाही तर समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना लक्षात ठेवून सर्व समाजासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, जागतिक महिला दिन साजरा करणे, क्रिकेट व इतर स्पर्धांचे आयोजन करणे, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विविध संगीतादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, समाजातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेशाचे वितरण करणे,विविध समाजातील गुणवंतांना बोलावून त्यांचा गौरव करणे व त्यांचा आदर्श सभासदांसमोर ठेवणे, तळागाळातील व्यक्ती पोस्टमन, खेळाडू यांचा मानसन्मान करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे
संस्थेने आता सुसज्ज डिपॉझिट लॉकरची सोय केली असून सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत. आजवर संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळलेल्या स्व. अनिल मुतकेकर,सर्वश्री विनायक कारेकर व विठ्ठल शिरोडकर आणि संस्थापक मोहन कारेकर यांच्या समर्थ नेतृत्वामुळेच संस्थेने प्रगती साधली आहे. त्यांना इतर सर्व संचालकांनीही मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून विठ्ठल शिरोडकर हेच अध्यक्षपदाची धुरा सांभाळून आहेत.
संस्थेने 2008 साली आपली दशकपूर्ती,2013 साली पंधरावा वर्धापन दिन आणि नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन, 2019 साली संस्थेची पहिली शाखा गणेशपुर गल्ली ,शहापूर येथील स्वतःच्या जागेत सुरू केली.

2020 व 21 ही दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसायाला ब्रेक लावणारी ठरली तरी सुद्धा सुवर्णलक्ष्मी सोसायटीने आपल्या पारदर्शक व्यवहारामुळेच प्रगतीचा टप्पा नेहमी चालूच ठेवला. गतसाली संस्थेने 43 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांच्या हिताच्या अनेक योजना संस्था आखीत आहे. ग्राहकांसाठी कार्यालयातच त्यांचे फोटो काढण्याची व कागदपत्रांचे झेरॉक्स देण्याची सोयही करण्यात आली आहे. यावर्षी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या सभासदांसाठी अंत्योदय मदत योजना, महिला सबलीकरण आणि मुख्य कार्यालयासाठी स्वतःची इमारत निर्माण करणे आदी योजना संचालक मंडळाच्या विचाराधीन आहेत. आजवर संस्थेला अनेक महनीय व्यक्तींनी, कलाकारांनी तसेच समाजातील मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.
सध्या संचालक मंडळात चेअरमन विठ्ठल शिरोडकर , व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर, संचालक विनायक कारेकर, प्रकाश वेर्णेकर, दीपक शिरोडकर समर्थ प्रताप कारेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सांबरेकर,मधुरा शिरोडकर, स्नेहल सांबरेकर, सुरेश पाटील यांचा समावेश असून अभय हळदणकर हे सेक्रेटरी म्हणून व प्रदीप किल्लेकर हे अकाउंटंट म्हणून काम पाहत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.