Friday, May 24, 2024

/

राष्ट्रीय मानव हकक आयोगाची कर्नाटक सरकारला नोटीस:

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराजवळ महिलेला विवस्त्र करून मारहाण आणि नंतर खांबाला बांधून घातल्याच्या घृणास्पद घटनेची राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने स्वयंप्रेरित दखल घेत कर्नाटक सरकारला नोटीस जारी केली आहे. चार आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर शनिवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनीही बेळगाव तसेच पीडितेच्या गावाला भेट दिली. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली. दरम्यान, महिलेच्या अवमानाचा निषेध करत भाजपने शनिवारी राज्यभर निदर्शने केली. तर भाजपच्या महिला खासदारांच्या शिष्टमंडळानेही पीडितेची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. यावरून आता राजकारण तापले असून, भाजप या प्रकरणात राजकारण करत असल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केली आहे. दरम्यान, पीडित महिलेला दोन एकर जमीन सरकारकडून देण्याची घोषणा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी केली.

राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने बेळगावनजीकच्या एका गावात घडलेल्या घटनेबद्दल राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि राज्य पोलिस महासंचालकांना
नोटीस पाठवली आहे. अशा अमानुष घटनांमुळे महिलांच्या हक्कांवर गदा आली आहे. प्रेमप्रकरणातून महिलेच्या मुलाने प्रेयसीला पळवून नेले. त्यानंतर मुलाच्या आईला मुलीच्या घरच्यांनी विवस्त्र करून गावामध्ये धिंड काढली. वीज खांबाला बांधून तिला मारहाण केली. बेळगावात
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या घटनेचे सविस्तर वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या आधारे राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने स्वयंप्रेरित तक्रार दाखल केली आहे.महिलेच्या विवस्त्र करणे, तिला मारहाण करणे हे मानव हक्कांचे उल्लंघन झाले. हा विषय गंभीर आहे.

‘त्या’ महिलेला २ एकर जमीन

 belgaum

पीडित महिलेला राज्य सरकारने २ एकर ३ गुंठे जमीन देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी दिली. या महिलेला महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळाने जमीन देण्याचे आदेश दिले आहेत. अनुसूचित जाती कल्याण, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाचे मंत्री बी. नागेंद्र यांनी ही विशेष बाब मानून तातडीने जमीन मंजूर करण्याचे आदेश दिले. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळाने पीडित महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी विशेष बाब म्हणून जमीन विकसित करण्यास मान्यता दिली आहे. २ एकर ३ गुंठे जमीन मंजूर करण्यासोबतच सरकारने पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, असे पालमंत्री जारकीहोळी यानी सांगितले.

अल्पवयीनासह तिघांना अटक आतापर्यंत ११ जणांना अटक

महिलेच्या अवमान घटनेप्रकरणी काकती पोलिसांनी यापूर्वी आठजणांना अटक केली आहे. शनिवारी एका अल्पवयीनासह आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. महिलेच्या घरावर १३ ते १५ जणांच्या समूहाने हल्ला करून महिलेला विवस्त्र करून विद्युत खांबाला बांधून मारहाण केली होती. याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन यापूर्वीच पोलिसांनी आठजणांना अटक केली होती.

शनिवारी काकती पोलिसांनी एका अल्पवयीनासह तिघांना अटक केली आहे. फरारी असलेल्या अन्य दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. बेळगाव ग्रामीण उपविभागाचे सहायक पोलिस आयुक्त एस. व्ही. गिरीश, काकतीचे प्रभारी पोलिस निरीक्षक नंदेश्वर कुंभार अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.