बेळगाव लाईव्ह : बेळगावात सोमवारी पासून कर्नाटक विधी विधि मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. सोमवारच्या दिवशी अधिवेशनाच्या पहिला दिवस होता नेमकं त्यादिवशी काय घडलं जाणून घेऊयात.
विधानसभेचा पहिला दिवस श्रद्धांजलीचा ठरला आहे.मान्यवर नेते, शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली .राज्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवदेखील करण्यात आला.विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निधन झालेल्या मान्यवरांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिले सत्र श्रद्धांजली वाहण्यात गेले.
दुपारी बारा वाजता विधानसभा कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर यांनी संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. त्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला.
माजी मंत्री डी. सी. चंद्रेगौडा, श्रीरंग देवराय, सी. वेंकटेशप्पा, श्रीकांत भिमन्नावर, विलासबाबू अलमेकर, पी. बी. आचार्य यांच्यासह जम्मू काश्मीर येथील राजौरी येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्यात चिकमगळूर येथील कॅप्टन एम. व्ही. प्रांजल यांच्यासह कॅप्टन शुभम गुप्ता हवालदार अब्दुल मजीद लान्स नायक संजय बिष्ट आणि सचिन लारा या पाच जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निधन झालेल्या मान्यवरांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष कौतुक केले. त्यांच्यानंतर विरोधी पक्ष नेते आर अशोक यांनीही श्रद्धांजली वाहिली. चिकमगळूर येथील हुतात्मा प्रांजल यांच्या वारसांना वाढीव मदत देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानंतर गृहमंत्री जी. परमेश्वर, कायदामंत्री एच. के. पाटील, अरग ज्ञानेंद्र आदींनी श्रद्धांजली वाहिली.
भाजप आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चेला सुरुवात करा अशी आग्रही मागणी करताना, प्रसंगी धरणे आंदोलनाचा इशाराही दिला.
विधानसभा कामकाज सुरु होण्याची वेळ सकाळी अकरा होती. पण प्रत्यक्षात दुपारी बारा वाजता सभागृहाला सुरुवात झाली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार बसवराज रायरेड्डी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.