बेळगाव लाईव्ह:चिक्कमंगळूर येथील प्रीतम नामक युवा वकिलावर पोलिसांनी केलेल्या प्राणघात हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावातील वकिलांनी आज सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे मानवी साखळीद्वारे रास्ता रोको आंदोलन छेडले.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकात शेकडोच्या संख्येने जमलेल्या वकिलांनी मानवी साखळी करून सुमारे तासभर चौकातील वाहतूक रोखून धरली. यावेळी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
आंदोलनाप्रसंगी बोलताना वकिलांनी चिक्कमंगळूर येथे युवा वकिलावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच समाजाचे अभिरक्षक असलेल्या वकिलांवरच पोलीस या पद्धतीने हल्ला करत असतील तर सर्वसामान्य जनतेची गती काय होईल? असा सवालही केला. यासाठी सरकारने वकिलांसाठी वकील रक्षण कायदा अस्तित्वात आणावा.
क्षुल्लक कारणावरून युवा वकिलावर पोलिसांनी हल्ला करण्याचा चिक्कमंगळूर येथील प्रकार निषेधार्ह असून हल्ला करणाऱ्या पोलिसावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वकिलांच्या आजच्या या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकातील रहदारी तास -दीड तास ठप्प झाली होती. बेळगावात सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे.
या अधिवेशनासाठी आलेले मंत्रीगण, विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेस, भाजपचे राज्याध्यक्ष यांच्या वर्दळीसाठी झिरो ट्रॅफिक व्यवस्था केलेल्या मार्गामध्ये राणी चन्नम्मा सर्कलचा देखील समावेश आहे.
येथील झिरो ट्रॅफिक व्यवस्थेमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या त्रासात वकिलांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे आज अधिकच भर पडली होती. कायद्याचे धडे देणाऱ्या वकिलांनी या पद्धतीने अचानक आंदोलन करून जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे? असा सवाल यावेळी सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत होता.