बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या मध्यवर्तीय ठिकाणी असलेल्या नरगुंदकर भावे चौकामध्ये अलीकडे वारांगणांचा उपद्रव वाढला असून पोलिसांनी याकडे लक्ष देऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसरात अलीकडे वारांगणाचा वावर वाढला आहे. सध्या सर्वत्र श्री गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सार्वजनिक श्री गणेशांचे दर्शन घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिक मुलाबाळांसह मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.
परगावचे नागरिक, गणेश भक्त देखील श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने बेळगावला भेट देत आहेत. त्यामुळे दररोज सायंकाळी शहरात विशेष करून शहराच्या बाजारपेठेत नेहमीपेक्षा जास्त गर्दी पहावयास मिळत आहे. या परिस्थितीत नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, रविवार पेठ, खडेबाजार, मारुती गल्ली वगैरे मध्यवर्तीय बाजारपेठेत देहविक्री करणाऱ्या वारांगणांचा उपद्रव वाढला आहे.
नरगुंदकर भावे चौक परिसरात संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सदर वारांगणा अश्लील हावभाव करत फिरत असतात. रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या पुरुष मंडळींकडे पाहून इशारा करणे, अश्लील बोलणे, अश्लील हावभाव करणे असे प्रकार करणाऱ्या या वारांगणामुळे सभ्य नागरिकांना भावे चौकात वावरणे कठीण झाले आहे.
सहकुटुंब बाजारात खरेदीसाठी अथवा गणेश दर्शनासाठी गेलेल्या कर्त्या पुरुष मंडळींची तर अश्लील हावभाव करत इशारे करणाऱ्या या वारांगणामुळे घरच्या मंडळींसमोर पंचाईत होत आहे. कारण रस्त्याकडेला थांबून या वारांगणा बऱ्याचदा हाका मारून डोळ्याला डोळा भिडवत मादक इशारा करत असतात.
एकंदर नरगुंदकर भावे चौकातील वारांगणाचा वाढता वावर नागरिकांसाठी मनस्ताप देणारा ठरत असून पोलीस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि उपद्रवी वारांगणाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.