Saturday, October 5, 2024

/

अनिल बेनकेंचे पुनर्वसन होणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप भुईसपाट झाला. केंद्रात जादुई करिष्मा हाती घेऊन देश चालविणाऱ्या भाजपचे कर्नाटकाच्या निवडणुकीत गणित चुकले. भाजपच्या या पराभवामागे अनेक कारणे आहेत. यापैकी महत्वाचे आणि प्रामुख्याने समोर येणारे कारण म्हणजे उमेदवारी देण्यात झालेला गोंधळ! कर्नाटकात अनेक ठिकाणी कित्येक इच्छुकांची उमेदवारी का कापली गेली? आणि इतरांना का उमेदवारी दिली गेली? यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

प्रामुख्याने बेळगाव उत्तर मतदार संघात विद्यमान आमदार असणारे अनिल बेनके यांचे काम समाधानकारक असूनही केवळ लिंगायत लॉबीला कुरवाळण्यासाठी मराठा समाजाचा रोष पत्करून भाजपने बेनके यांना डावलले. अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर भाजपाला धडा शिकविण्यासाठी मराठा समाज पेटून उठला. उत्तर मतदार संघात भाजपाला मिळणारी विजयी जागा हातची गेली. आणि त्यानंतर पराभवाची कारणमीमांसा शोधल्यानंतर मराठा समाजाला पुन्हा आपल्याकडे वाळविण्यासाठी भाजपाची पावले हळूहळू मराठा समाजाच्या दिशेने पुढे पडू लागली आहेत.Anil benke

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आणि मराठा समाजाचा रोष पत्करल्यानंतर माजी आमदार अनिल बेनके यांच्या पुनर्वसनासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत हालचाली होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपचा कर्नाटकात सपाटून झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून याचा परिणाम आता काहीसा दिसून येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

सध्या मराठा समाजाची ताकद लक्षणीय आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज ताकदवान बनू लागला आहे. मराठा संघटन एकजूट होत आहे. कर्नाटकात सुमारे ८० ते ८५ लाख मराठा समाज निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर आपलं वजन कशापद्धतीने वापरू शकतो हे आता सिद्ध होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता मराठा समाजातील स्वतःची नाळ जोडलेल्या अनिल बेनके यांच्यासारख्या नेत्याला घरी बसवणं हे भाजपलाच घरी बसवल्याचं समीकरण बनलं आहे. यामुळे मराठा समाज भाजप पासून दुरावला असून अनिल बेनके यांच्या रूपाने मराठा समाजाला परत फुत्कारण्याचा प्रयत्न आता भाजप करणार यात शंका नाही. अनिल बेनके यांचं पुनर्वसन करून पुन्हा एकदा मराठा समाजाला आपल्याकडे भाजप वळविण्याच्या तयारीत असून विधान परिषदेत अनिल बेनके यांना संधी देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

विधानपरिषद निवडणुका जाहीर झाल्या असून विधानपरिषदेत सध्या लक्ष्मण सवदी यांच्यासह एकूण तीन जागा रिक्त आहेत. या तीन जागांपैकी एका जागेवर अनिल बेनके यांना स्थान मिळू शकते का याची चाचपणी सुरु झाली आहे. अनिल बेनके यांना स्थान देऊन भाजप मराठा समाजाला आपल्याकडे वाळविण्याच्या विचारात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मराठा समाजातील एकही लक्षणीय नेता आता भाजपाकडे नसल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल बेनके यांचं बळ वाढवणं भाजपासाठी गरजेचं बनलं आहे. ‘अपराजित आमदार’ असा शिक्का असलेले अनिल बेनके, उत्तर मतदार संघात भाजपाची गेलेली सत्ता या सर्वांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठा समाजाला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, यात शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.