Friday, March 29, 2024

/

मतमोजणीदिवशी १४४ कलम जारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असून बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ मतदार संघातील मतमोजणी बेळगावमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात होणार आहे.

मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव जिल्ह्यात १४४ कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

शनिवारी दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली असून निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना समर्थक, विरोधक, कार्यकर्ते यांच्यात वादावादीचे प्रकार दिसून येतात. मात्र निकालदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४४ कलम जारी करण्यात आला असून प्रक्षोभक घोषणा, जाहीर सभा यासारख्या प्रकारांना आळा घालण्यात आला आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शुक्रवार दि. १२ मे रोजी सायंकाळी ५ ते ते रविवार दि. १४ मे रोजी सकाळी ७ पर्यंत कर्नाटक पोलीस कायदा १९६३ च्या कलम ३५ अंतर्गत १४४ कलम जारी करण्यात आला आहे.

 belgaum

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यात ५ पेक्षा जास्त लोकांची सभा, मिरवणूक किंवा सार्वजनिक/राजकीय सभा समारंभ आयोजित करण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारची शरीराला धोका निर्माण करणारी, कोणतीही शस्त्रे बाळगणे आणि घेणे प्रतिबंधित आहे. दगड, स्फोटकं किंवा कोणतीही आग लावणारी सामग्री इत्यादी वाहून नेण्यास आणि ठेवण्यास मनाई आहे.

याकालावधीत मानवी प्रतिकृती किंवा पुतळे प्रदर्शित करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीच्या समर्थनार्थ किंवा विरोधार्थ प्रक्षोभकजनक वक्तव्य करणे, घोषणा देण्यास मनाई आहे. कोणाच्याही प्रतिष्ठेला आणि नैतिकतेला बाधा पोहोचवणारे किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे कोणतेही कृत्य करण्यास सक्त मनाई आहे. हा आदेश अंत्यसंस्कार किंवा विवाह आणि धार्मिक मिरवणुकांना लागू होत नाही. विवाह आणि इतर धार्मिक मिरवणुकांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करू नये तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घ्यावी.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.