Friday, April 19, 2024

/

पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीला प्राधान्य

 belgaum

पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे सर्वप्रथम उद्यापासूनच जिल्ह्यातील सर्व आमदारांना माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा पुरवठा करण्याचे काम हाती घेतले जावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी सकाळी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री सतीश जारकीहोळी बोलत होते. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना दूरवर जायला लागू नये त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना समीपच्या जागी बियाणे उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली जावी.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ज्या कुटुंबीयांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे ती त्वरित अदा केली जावी. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावर मालकांची अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन भेट घ्यावी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. कारण सरकारकडून नुकसान भरपाई मिळविण्याची प्रक्रिया बहुतांश जणांना माहीत नसल्यामुळे ते त्यापासून वंचित राहतात. यासाठी स्वतः अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

 belgaum

आता शाळांना प्रारंभ होत असल्यामुळे अतिथी शिक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. तसेच धोकादायक शाळा इमारतींची दुरुस्ती केली जावी अशी सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध असेल याकडे लक्ष दिले जावे. त्याचप्रमाणे बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणारी यंत्रोपकरणे लवकरात लवकर बसवण्याबरोबरच त्यांचे उद्घाटन करून ती कार्यान्वित केली जावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी प्रदेशात ज्या ठिकाणी बीपीएल कार्डधारकांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी रेशन दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी. जिल्ह्यातील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण केले जावे. कारण या कामाला जेवढा उशीर होईल तेवढी पाण्याची समस्या बिकट होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत सदर काम पूर्ण केले जावे आणि याकडे अधिकारी वर्गाने लक्ष पुरवावे असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव शहराचा पाणीपुरवठा तसेच अन्य प्रमुख विषयांवर लवकरच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नव्या सरकारने आखून दिल्याप्रमाणे अधिकारी वर्गांनी काम करावयास हवे. जनतेला उत्तम प्रशासन देणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य असणार आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. क्रियाशील अधिकाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी आम्ही कायम प्रोत्साहन देऊ, असेही सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.

महिला आणि बालकल्याण तसेच दिव्यांग व जेष्ठ नागरिक सक्षमीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी बोलताना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यामध्ये कांही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यावर त्वरित मार्ग काढून शेतकऱ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई दिली जावी असे सांगितले. रोजगार हमी योजनेतील कामांचा लाभ शेतकऱ्यांनाही करून दिला जावा. शाळांना प्रारंभ होत असल्याने शाळांमध्ये आवश्यक असणारे डेस्क तसेच अन्य साहित्य उपकरणे त्वरेने उपलब्ध होतील याकडे लक्ष दिले जावे असे मंत्री हेब्बाळकर यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती संदर्भातील प्रस्ताव मागून सरकारच्या मंजुरीने पुढील योग्य क्रम घेतले जातील असे सांगून सांबरा येथे 3500 बीपीएल कार्डधारक आहेत. इतक्या मोठ्या संख्येने बीपीएल कार्डधारक असल्यामुळे त्या ठिकाणी रेशन दुकान सुरू केले जावे अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.Meeting

जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी केली जावी. चंदन होसुर, बेक्कीनकेरी, बेनकनहळ्ळी आदी कांही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा अशी सूचना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना केली. जनतेने काँग्रेस सरकारवर दाखविलेला विश्वास आपण सर्वांनी सार्थ ठरविला पाहिजे. यासाठी अधिकारीवर्गाने जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरेने निवारण केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी बियाणं वितरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत माहिती दिली. बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांनी शाळा सुरू झाला असल्यामुळे अतिथी शिक्षक नेमणुकीची प्रक्रिया त्वरित हाती घेतली जावी असे सुचविले. खुर्चीचे आमदार महेंद्र तमन्नावर यांनीही कांही सूचना केल्या.

सदर जिल्हास्तरीय बैठकीच्या औचित्य साधून बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला यांच्या हस्ते नूतन मंत्री सतीश जारकीहोळी तसेच लक्ष्मी हेब्बाळकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बैठकीस जिल्ह्यातील अन्य आमदारांसह सरकारच्या सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.