Tuesday, April 23, 2024

/

सीमावासीयांवरील अन्यायाचे पडसाद महाराष्ट्रात नक्कीच उमटतील : रोहित पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमावासीयांचा लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून सुरू आहे. अन्यायाविरोधात मराठी माणूस उभा ठाकला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्राने उभे राहणे आवश्यक आहे. येथील मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देत सीमावासीयांचा आवाज विधानसभेत उंचावण्यासाठी मराठी जनतेने महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी केले.

बेळगुंदी येथील हुतात्मा चौकात सोमवारी आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी रामा पाटील हे होते. या सभेत व्यासपीठावरून जनतेला आवाहन करताना रोहित पाटील म्हणाले, सीमाभागातील मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हुतात्म्यांनी केले आहे.

त्यांनी सर्वोच्च बलिदान देऊन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. आज मराठी माणसांची ताकद कमी करण्यासाठी पैशांचा वापर करण्यात येत आहे. पण, अशा प्रकारांना कधीही भीक घालू नका. जे लोक छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांच्यासोबत मराठी माणसाने कधीही थांबू नये. आजही सीमाभागात पारतंत्र्यात असल्याचे चित्र आहे. पण, आता युवा वर्ग पेटून उठला असून आपल्याला विजय मिळेपर्यंत लढा द्यावा लागणार आहे. येथील जमिनी वाचवण्यासाठी, मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि मराठी भाषा, अस्मितेसाठी म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.Rohit pawar

 belgaum

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, आम्ही सर्व जण एक झालो आहोत. त्यामुळे मतदारांनी नेत्यांकडे बोट न दाखवता, म. ए. समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून प्रचंड बहुमतांनी निवडून आणावे. सीमाभागातील मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर म. ए. समितीशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. याचप्रमाणे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी, कोणत्याही राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना बळी न पडता मराठी माणसाने एकजुटीने आर. एम. चौगुले यांना मतदान करावे, असे आवाहन केले. तर अध्यक्ष रामा पाटील यांनी राष्ट्रीय पक्ष केवळ मराठी माणसांचा वापर करुन घेत आहेत. त्याचा विचार करून हक्काच्या मराठी माणसासोबत राहावे, असे आवाहन केले.

यावेळी रोहित पाटील यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. हुतात्म्यांचे वारस जोतिबा उचगावकर, धुळोबा गावडा, शट्टुप्पा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर अ‍ॅड. एम. जी. पाटील, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. किरण मोटणकर, राजू किणयेकर, मारूती शिंदे, महेश पावसकर, पुंडलिक सुतार, ईश्वर पाटील, रामा आमरोळकर, अरूण जाधव, सुनील झंगरुचे, संभाजी बागिलगेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.