belgaum

बेळगाव लाईव्ह : वळिवाच्या पावसाने यंदा म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलाशयातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयानेही तळ गाठला असून बेळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

bg

बेळगाव शहराला हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पिण्याचे पाणी पुरवठा केले जाते. मात्र राकसकोप्प जलाशयाची पातळी घटली असन शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवू लागला आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तलाव, कालवे यांचे पात्र कोरडे पडले असून अनेक ठिकाणी केवळ पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. जलाशयातील मोजक्याच पाणीसाठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची कमाल क्षमता दोन हजार ४७६. २५ फूट असून जलाशयाची पाणी पातळी दोन हजार २४५ फूट आहे.

मागील वर्षापेक्षा जलाशयात तीन फुटाने पाणी पातळीत घट झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी न लावल्यास डेडस्टोरेजमधून पाणी उपसा करावा लागण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे घटप्रभा आणि मलप्रभा नदीची पाणी पातळीही दिवसेंदिवस घटत चालली आहे.

बेळगाव शहराला घटप्रभा नदीवरील हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. हिडकल जलाशयाचा साठा ५१ टीएमसी इतका असून सध्या जलाशयात १३.६ टीएमसी पाणीसाठा आहे. दररोज ११३ क्युसेक पाणी जलाशयातून बाहेर सोडले जाते. मागील वर्षी याच काळात जलाशयात १४.८० टीएमसी पाणी होते.

मलप्रभा नदीवरील नवीलूतीर्थ जलाशयाची क्षमता ३७.७३ टीएमसी असून जलाशयात सध्या १४.६ टीएमसी पाणी आहे. यातून रोज ९४४ क्युसेक पाणी बाहेर सोडले जाते. मागील वर्षी जलाशयात १९.५ टीएमसी पाणी शिल्लक होते. येत्या महिनाभरात पाऊस न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.