Friday, March 29, 2024

/

बेळगावात फडणवीसांना काळी निशाणे…

 belgaum

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिळक चौक येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता या सभेला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे निशाण दाखवून त्यांचा निषेध केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवून आपला संताप व्यक्त केला. प्रकाश मरगाळे नेताजी जाधव, अनिल आमरोळे, रणजित चव्हाण पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, बाबू कोले, सुनील बाळेकुंद्री आदींनी सीमाप्रश्नी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. टिळकचौक परिसरातून रिझ टॉकिज परिसराच्या दिशेने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखून धरत पुढे ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी मराठी भाषिक कार्यकर्त्या सोबत धककबुक्की केली फरफटत एका ठिकाणी स्थानबद्ध केलं.बुधवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून सीमाभागात समिती उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांचा विरोध करण्याचे आवाहन केले होते. आज सीमाभागात महाराष्ट्रातून भाजपसह काँग्रेसचे नेतेही प्रचारासाठी येणार असून या सर्व नेत्यांना विरोध करण्याचे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. यानुसार आज या नेत्यांचा विरोध करण्यासाठी उतरलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पोलिसी दडपशाहीला सामोरे जावे लागले.सीमाभागातील जागांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लढविण्यात येणाऱ्या निवडणुकीचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटण्याची शक्यता आहे.Fadanwis black

 belgaum

यापूर्वी सकाळी प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये दाखल झाले होते

बेळगाव विमान तळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. मी येथे माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. मात्र खासदार संजय राऊत काँग्रेसच्या सांगण्यावरून आमची मते कमी करण्याकरता काँग्रेसची दलाली करण्याकरता येथे आले आहेत असा आरोप केला होता.

प्रारंभी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर बेळगावात तुमची भूमिका काय असणार? या प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी येथे आलो होतो. जर परंपरेचा विचार करा तर विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे या ठिकाणचे प्रभारी होते आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये सगळीकडे ते फिरत होते. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. आपण मराठी भाषिकांच्या मागे नाही आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना येथील मराठी भाषिकांच्या पाठीशी मी पण आहे आणि भारतीय जनता पक्ष देखील आहे आणि म्हणूनच कर्नाटकात मराठा महामंडळ स्थापन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.

महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात बोलताना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी येथे येतात. आम्हाला सांगण्यापेक्षा संजय राऊत यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला हवे होते की तुम्ही येथे उमेदवार उभे करू नका. काँग्रेसच्या नेत्यांना प्रचारासाठी आणू नका. मात्र ते असे बोलत नाहीत. कारण काँग्रेसच्या सांगण्यावरूनच आमची मते कमी करण्याकरिता काँग्रेसची दलाली करण्यासाठी ते येथे आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.