belgaum

सात नवीन वीजखांब व स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांना दिलासा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनेक दिवसांपासून अंधाराच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या येळ्ळूर येथील हणमंतगौड नगरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. परिसरातील वीज आणि स्ट्रीट लाईटच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हणमंतगौड नगरातील रहिवाशांनी या समस्येबाबत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे निवेदन देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर सतीश पाटील यांनी तातडीने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि कामास मंजुरी मिळवून दिली.

या कामाअंतर्गत चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून उमेश पाटील यांच्या घरापर्यंत सात सिमेंटचे वीजखांब उभारण्यात आले. तसेच सर्व खांबांवर स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्याने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.

 belgaum

यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कामाचा काही भाग पूर्ण करण्यात आला होता. मात्र उर्वरित काम पूर्ण झाल्याने हणमंतगौड नगरातील नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे वावरता येत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष समाधान व्यक्त होत आहे.

या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांचे स्थानिक नागरिक आणि गावकऱ्यांनी अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.