बेळगाव लाईव्ह : श्रीराम सेनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी भाजप नेते किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी होदेगेरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच बेळगावातील सकल मराठा समाजाच्या सामाजिक उपक्रमांचे आणि किरण जाधव यांच्या कार्याचे मुतालिक यांनी कौतुक केले.
बैठकीत होदेगेरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन विकासकामांना गती देण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने आगामी काळात श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज संयुक्तपणे शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बेळगावमध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची माहिती मुतालिक यांनी जाणून घेतली. या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत किरण जाधव यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, “होदेगेरे येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी यासाठी श्रीराम सेना आणि सकल मराठा समाज एकत्रितपणे सरकारकडे ठोस पाठपुरावा करणार आहेत.”
बैठकीस श्रीराम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच किरण जाधव आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.




