Friday, September 20, 2024

/

उमेदवारीवरून जारकीहोळींनी उभा केला मोठा पेच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या रमेश जारकीहोळी यांनी भाजप हायकमांडसमोर आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीवरून मोठा पेच निर्माण केला आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघात नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उचलून धरत काही जागांवर आपण सुचवलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बेळगाव आणि किनारपट्टी भाग वगळता राज्यातील उमेदवारांची यादी पूर्ण झाली आहे. सदर यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आली असून दिल्ली येथे भाजप संसदीय मंडळाच्या होणाऱ्या सभेत उमेदवारी अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत. साधारण ८ एप्रिल रोजी पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे तर १० एप्रिल पर्यंत दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे.

बेळगावमधील एकूण १८ विधानसभा मतदार संघासाठी जाहीर होणाऱ्या उमेदवारीबाबत अनेक अडचणी उभ्या होत आहेत. एकीकडे रमेश जारकीहोळी आणि दुसरीकडे इराण्णा कडाडी यांनी आपापल्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा तगादा हायकमांडकडे लावून धरला आहे. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यानंतर हि दरी मिटेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगावदौऱ्यानंतर देखील भाजपमधील मतभेद मिटले नसल्याचे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. रमेश जारकीहोळी यांनी घेतलेल्या या भूमिकेला लक्ष्मण सवदी, अण्णासाहेब जोल्ले आणि इराण्णा कडाडी यांनी तीव्र विरोध केला आहे.

ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान आमदार आणि रमेश जारकीहोळी यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. याचप्रमाणे कर्नाटकातील भाजप सरकारला सत्तेवर आणण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी निभावलेली भूमिकाही महत्वाची आहे. यामुळे रमेश जारकीहोळी यांनी आपल्या समर्थक इच्छुकाला उमेदवारी देण्यासाठी हायकमांडकडे जोर धरला आहे.

उमेदवारीसह इतर अनेक मागण्या रमेश जारकीहोळी यांनी भाजप केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे मांडल्या आहेत. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचे वाढते वजन पाहून भाजपमधील काही गटांनी नाराजी व्यक्त करत रमेश जारकीहोळी राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही केला जात आहे.

या नाराज गटाची मनधरणी करण्याची विशेष मोहीम राज्य भाजपने हाती घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी जबाबदारी उचलली आहे. काँग्रेसने पहिली उमेदवारी यादी जाहीर करून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरु असलेल्या जोरदार कब्बड्डीमुळे हायकमांडसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.