बेळगाव लाईव्ह : मराठी जनतेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा सपाटा कर्नाटक प्रशासनाने चालवला आहे. कर्नाटकाच्या अन्यायाला आणि दुटप्पी वागणुकीला कंटाळून मराठी जनतेने चोहोबाजूंनी एकीची वज्रमूठ आवळली आहे. खानापूर, ग्रामीण, दक्षिण, उत्तर, यमकनमर्डी, निपाणी अशा अनेक ठिकाणी मराठी माणसाने आपली अस्मिता दाखविण्यास सुरुवात केली असून याची धास्ती कर्नाटक प्रशासनाला लागली आहे.
खानापूर विभागात महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रचाराला झंझावाती सुरुवात केली असून कुरघोड्या करणाऱ्या प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समिती उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या फलकावरून ‘ड्रामा’ सुरु केला. मात्र मराठी माणूस देखील सुज्ञ आहे. कायदा आणि नियमांबाबत जागरूक असणाऱ्या मराठी भाषिकांनी अधिकाऱ्यांनाच संतप्त सवाल केले आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी खानापूरचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर फलक उभारण्यात आला होता. हा फलक बेकायदेशीर असल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी तो हटविला. फलक लावण्यासाठी ८ X ८ या आकारातील फलकाची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार खानापूर तालुका समितीने कायद्यानुसार फलक उभारला.
मात्र पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नवे कारण पुढे करत महाराष्ट्र एकीकरण समिती हा अधिकृत पक्ष नसून अशापद्धतीने फलक लावता येणार नसल्याचा कांगावा केला. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोणत्या कायद्यानुसार हि तरतूद आहे? आणि यासंदर्भात लेखी स्वरूपात नोटीस देण्याची मागणी केली. सदर फलक हा कायद्यानुसार लावण्यात आला असल्याचे ठामपणे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना परत पाठविण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सिताराम बेडरे, खजिनदार संजय पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, समितीचे कायदा सल्लागार केशव कळ्ळेकर, उमेदवार मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, नागेश भोसले, अर्जुन देसाई, विठ्ठल गुरव, मऱ्यापा पाटील आदी उपस्थित होते.