बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सोमवारी सकाळी सरस्वतीनगर येथील ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद मागितले.
यावेळी आशीर्वाद देताना कॉ कृष्णा मेणसे यांनी सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असून निवडणुकीतील विजय आपल्यासाठी जमेची बाजू होऊ शकते असे सांगितले. त्याचप्रमाणे बेळगाव दक्षिण मतदार संघाबद्दल मतदार संघ कसा आहे? किती मतदार आहेत? निवडणुकीसाठी काय नियोजन केले आहे? वगैरे माहिती रमाकांत कोंडुसकर यांच्याकडून जाणून घेतली.
कोंडुसकर यांची चौकशी करताना निवडणूक जिंकायची असेल तर कार्यकर्त्यांचे पाठबळ लागणार. तेंव्हा नियोजन व्यवस्थित करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, असा मार्गदर्शनपर सल्ला काॅ. कृष्णा मेणसे यांनी दिला.
यावेळी समिती उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी काॅ. मेणसे यांना सोबत असलेले कार्यकर्ते, निवडणूक प्रचार नियोजन वगैरे सर्व माहिती दिली. याप्रसंगी काॅ. मेणसे यांचे सुपुत्र ज्येष्ठ विचारवंत जी. एस. एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे, शेखर पाटील, सुहास हुद्दार आदी उपस्थित होते.