बेळगाव लाईव्ह :जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे “प्लास्टिक-मुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र” उपक्रमांतर्गत आज शुक्रवारी सकाळी रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अलीकडे झालेल्या बैठकीत “प्लास्टिक-मुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र” तयार करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावानुसार, बोर्डाचे अध्यक्ष एमएलआयआरसी बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून कॅन्टोन्मेंट परिसरातील रेल्वे स्टेशन बस स्थानकाच्या ठिकाणी बोर्डाच्या समर्पित सफाई कर्मचाऱ्यांकडून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
अत्याधुनिक वॉटर टँकर जेट मशीनचा वापर करून संपूर्ण बस स्थानक परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. याव्यतिरिक्त परिसरातील साचलेला कचरा गोळा करण्यासाठी एक ट्रक आणि एक ऑटो वाहन तैनात करण्यात आले होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या या विशेष मोहिमेअंतर्गत अंदाजे 2.5 टन कचरा हटवण्यात आला असून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. उपरोक्त स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रवासी, बस चालक, व्यापारी, रेस्टॉरंट मालक आणि सर्वसामान्य जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

सदर विशेष स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बोलताना “स्वच्छता हे केवळ सरकारी संस्थांचे कर्तव्य नाही; ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करून कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करू नये.
तसेच जागतिक पर्यावरण सप्ताहादरम्यान, आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, सार्वजनिक जागांचे जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, हरित व अधिक सुंदर बेळगाव घडवण्यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहन बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी केले आहे.




