बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाचे नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम (Public Works Department – PWD) खाते सोपविण्यात आले आहे.
राज्यपालांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बहुतांश मंत्र्यांना मागील कार्यकाळातीलच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रशासनातील सातत्य राखण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. सतीश जारकीहोळी यांनी मागील कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले होते आणि त्याच खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे पुन्हा सोपविण्यात आली आहे.
मंत्रिमंडळातील काही खात्यांमध्ये मात्र किरकोळ फेरबदल करण्यात आले आहेत. नगर विकास खात्याची जबाबदारी यावेळी डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात काही मर्यादित बदल दिसून येत आहेत.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी वित्त, मंत्रिमंडळ व्यवहार, कार्मिक व प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर विभाग तसेच इतर वाटप न झालेली खाती स्वतःकडे ठेवली आहेत. उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे महसूल व क्रीडा खाते देण्यात आले आहे.
प्रमुख मंत्र्यांची खाती
- डी. के. शिवकुमार (मुख्यमंत्री) – वित्त, मंत्रिमंडळ व्यवहार, कार्मिक व प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर
- डॉ. जी. परमेश्वर – महसूल, क्रीडा
- के. एच. मुनियप्पा – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार
- के. जे. जॉर्ज – ऊर्जा, पर्यटन
- एम. बी. पाटील – मोठे व मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा विकास
- रामलिंगा रेड्डी – प्रमुख व मध्यम सिंचन
- सतीश जारकीहोळी – सार्वजनिक बांधकाम
- कृष्णा बायरेगौडा – बेंगळुरू विकासाशी संबंधित विभाग
- प्रियांक खर्गे – गृह (गुप्तचर वगळून), आयटी-बीटी, ई-गव्हर्नन्स
- यू. टी. खादर – आरोग्य व कुटुंब कल्याण
- ईश्वर खंड्रे – ग्रामीण विकास व पंचायत राज
- डॉ. यतींद्र सिद्धरामय्या – नगर विकास
- बैरत्ती सुरेश – परिवहन
- शरणप्रकाश पाटील – वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकास
सतीश जारकीहोळी यांच्याकडे पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविल्याने राज्यातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




