Wednesday, April 17, 2024

/

शिवाजी कागणीकर ‘मानद डॉक्टरेट’ पदवीचे मानकरी

 belgaum

कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विद्यापीठ गदग या विद्यापीठाच्या उद्या शुक्रवार दि. 10 मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जल संरक्षक शिवाजी कागणीकर यांच्यासह दोघा जणांना आपापल्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.

शिवाजी कागणीकर यांनी आपले संपूर्ण जीवन रात्रीच्या शाळा सुरू करून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी वाहिले आहे. त्यांच्या पुढाकाराने बेळगाव ग्रामीण भागात तलाव निर्माण करून पाण्याची संवर्धन केले जात आहे. गदगच्या कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदवीचे दुसरे मानकरी ए. पी. चंद्रशेखर हे आहेत. जे म्हैसूर येथील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत. सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात चंद्रशेखर यांचे नांव सुप्रसिद्ध असून कर्नाटकातील शाश्वत शेतीमधील त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

शिवाजी कागणीकर यांच्याबद्दल बोलावयाचे झाल्यास सर्वोदय चळवळीचे बाळकडू मिळालेले पदवीधर शिवाजी कागणीकर यांचे आयुष्य म्हणजे समाजाप्रती अर्पण केलेली आहुतीच म्हणावे लागेल. अंगात खादीचे शर्ट, खादीची हाफ पॅन्ट, डोक्यावर गांधी टोपी अशा साध्या पोशाखातील शिवाजी कागणीकर यांचा 1972 पासून विभिन्न ग्रामीण विकास कार्यक्रमांमध्ये सहभाग आहे. त्यांनी जवळपास 500 हून अधिक शेतकऱ्यांना गोबर गॅस उभारण्यास मदत केली आहे.

 belgaum

कट्टनभावी आणि परिसरात पाणलोट उपक्रम सुरू करणाऱ्या कागणीकर यांनी 12 वर्षाहून अधिक काळ ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा प्रकल्प राबविला आहे. त्यांच्या पुढाकाराने कट्टनभावी परिसरातील शेकडो विहिरींचे पुनरुज्जीवन झाले आहे. शिवाजी कागणीकर यांनी विविध गावांमध्ये दोन लाख 50 हजार रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ग्रामीण महिलांसाठी 10 बचत गटांची स्थापना करण्यास सहकार्य केले आहे.shivaji kaganikar 2

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर शिवाजी कागणीकर हे रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी विशेष प्रयत्नशील असतात. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण आणि जैविक बाग या संदर्भातील अनेक उपक्रम राबविले आहेत.

माहितीचा अधिकार रोजगार हमी योजना लागू झाल्यानंतर त्यांच्या कायद्यांची योग्य प्रकारे माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात कागणीकर यांचा मोठा वाटा आहे. रोजगार हमी योजनेतील कामगारांना न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने झटत असतात. याखेरीज भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत देखील अग्रेसर राहणाऱ्या शिवाजी कागणीकर यांना अनेक नामवंत संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.