Saturday, April 20, 2024

/

राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. युवा क्रांती मेळाव्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जाहीरनामा सादर केला. कर्नाटक काँग्रेस कार्यकारिणीसह बेळगावमधील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून राहुल गांधींनी भाषण केले. यावेळी कर्नाटकातील भाजप सरकारवर राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढविला.

काँग्रेसने भारत जोडो यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेला देशवासियांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत जोडो यात्रेत कोणता रथ नव्हता. या यात्रेत अनेकांनी एकत्रित पायी प्रवास केला. या यात्रेत द्वेष, हिंसा शिकविण्यात आली नाही तर भारत जोडो यात्रेने देशाला एक संदेश दिला. समता, बंधुता जपण्याचा संदेश देणाऱ्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकातील जनतेनेही मोठा प्रतिसाद दिला. देशात अनेक विचित्र घटना घडत असून यामुळे देशाची प्रगती खुंटली आहे. सत्तेवर असलेल्या काही निवडक लोकांचा आणि अदानी सारखया उद्योगपतींचा हा देश नसून गरीब, कामगार, शेतकरी, तरुणांचा आपला देश आहे. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार हे कर्नाटकातील भाजप सरकार असून हे सरकार ४० टक्क्यांचे सरकार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

आपल्या भाषणात त्यांनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले. कर्नाटकात झालेला शिक्षक भरती घोटाळा , कंत्राटदाराची आत्महत्या या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समिती आणि कंत्राटदार समितीने पंतप्रधानांकडे लेखी तक्रार करूनही पंत्रप्रधानांनी आजवर त्या पत्राचे उत्तर दिले नाही. कर्नाटकातील आमदारांच्या मुलाला पकडले जाते अशांना हे सरकार संरक्षण देते, पीएसआय भरती घोटाळा, म्हैसूर सोप कार्पोरेशन घोटाळा यासह अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा राहुल गांधी यांनी पाढा वाचला.Public rahul gandhi rally

कर्नाटक सरकार तरुण बेरोजगारांना रोजगार देऊ शकत नाही, आणि केंद्रातील सरकार सर्वसामान्यांना सोडून बड्या उद्योजकांना सहकार्य करत आहे. सर्व सुविधांचा लाभ हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. यामुळे असे घोटाळे होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.Rahul gandhi

आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसची सत्ता नक्की येईल, असा विश्वास व्यक्त करत सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक पदवीधरांना पुढील २ वर्षांसाठी प्रति महिना ३०००, डिप्लोमाधारकांना प्रति महिना १५०० तर १० लाख तरुणांना येत्या ५ वर्षात रोजगार उपलब्ध करून देईल, असे आश्वासन दिले. येत्या काळात २.५ लाख रिक्त सरकारी पदे भरणार,

महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रति महिना २००० रुपये, अन्नभाग्य योजनेंतर्गत १० किलो तांदूळ, गृहज्योती अंतर्गत मोफत २०० युनिट वीज, याचप्रमाणे अनुसूचित जातींचे १५ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आणि अनुसूचित जमातींचे ३ टक्क्यांवरून ७ टक्के वाढीव आरक्षण यासह अनेक गोष्टींचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. यावेळी आगामी निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बहुमतांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.