Thursday, June 20, 2024

/

गद्दारांना कार्यकर्तेच धडे शिकवतील : समिती बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींसह विविध समिती नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीमध्ये पडलेली फूट आणि यासाठी कारणीभूत असलेल्या गद्दारांविरोधात नाराजीचा सूर उमटला.

शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी बोलताना आपल्यासाठी हि नवडणूक कशी महत्वाची आहे, याबद्दल विचार व्यक्त केले. आपल्याला सत्तेसाठी नव्हे तर आपले म्हणणे मांडण्यासाठी, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडून याविरोधात आवाज उठविण्यासाठी आपल्याला हि निवडणूक लढायची आहे आणि जिंकायची आहे. आपल्याकडून हिरावले अधिकार परत मिळविण्यासाठी हि निवडणूक एक माध्यम आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपले अस्तित्व सिद्ध करायचे आहे, आपण हि निवडणूक जिंकणारच असा निर्धार प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना ऍड. राजाभाऊ पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यातील समितीमध्ये पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समितीमध्ये एकी करण्यासाठी मध्यवर्तीने कमिटी नेमून एकी केली, या एकीतून नव्या कार्यकारिणीची स्थापना केली असूनही खानापूरमध्ये घडलेला प्रकार हा निषेधार्थ आहे. आजच्या बैठकीत खानापूरमध्ये घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून गोपाळ देसाई यांच्या अंतर्गत निवड करण्यात आलेली समितीच अधिकृत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर, बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर आणि निपाणी मतदार संघात निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असून या निवडणुकीत एकमेव उमेदवार निवडण्यासाठी घटकवार समित्यांनी बैठका घेऊन, ज्या उमेदवाराला अधिकाधिक पाठिंबा आहे, त्याच उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.Mes

 belgaum

माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक आपल्याला जिंकायलाच हवी. आपले हाल – अपेष्टा दूर करण्याची हीच संधी असून विजयासाठी घटक समित्या तयारीला लागल्या आहेत. या निवडणुकीत समितीचाच आमदार निवडून यावा अशी जनतेची भावना असून लोकशाहीचा हक्क आणि आडमुठेपणा दाखवून दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणाऱ्या हरामखोरांना कार्यकर्तेच धडा शिकवतील, असे ते म्हणाले. एक उमेदवार जाहीर झाल्यानंतर वरदहस्त मिळवून दुसरा उमेदवार उतरविणाऱ्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होऊन, नेत्यांमध्ये एकी नसल्याचे जाणवल्याने सीमावासीय राष्ट्रीय पक्षांना मतदान करत आहेत. ज्या खानापूरमध्ये ६ महिने प्रयत्न करून एकी झाली, त्याच ठिकाणी गद्दारांनी दुसरी समिती स्थापन करण्याचा कट रचला. अशा गद्दारांना घराबाहेर पडू देऊ नका, असे आव्हान किणेकर यांनी खानापूरवासियांना केले. खानापूर समितीला लागलेली हि लागण सीमाभागात इतरत्र पसरू नये यासाठी आता कार्यकर्तेच गद्दार विरोधी समिती स्थापन करून गद्दारांना योग्य धडा शिकवतील, आणि अशा समित्यांचा मध्यवर्ती नक्कीच पाठपुरावा करेल, असे ते म्हणाले.

या बैठकीत माजी महापौर मालोजी अष्टेकर, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, ऍड. एम. जी. पाटील, निपाणी समितीचे जयराम मिरजकर आदींसह अनेकांनी विचार मांडले. या बैठकीला समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.