बेळगाव लाईव्ह |
श्रद्धा, सेवा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला तो कंग्राळी येथील पाटील कुटुंबाच्या उपक्रमातून. उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध भगवान केदारनाथ मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तब्बल एक किलो वजनाचा चांदीचा नामफलक देणगी स्वरूपात अर्पण करून विजय पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भाविकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
विजय पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या कुटुंबासह दरवर्षी जून महिन्यात केदारनाथ यात्रेसाठी जात आहेत. त्यांच्यासोबत पत्नी स्नेहा पाटील, पुत्र रुद्रांश पाटील, भाऊ श्रीनाथ पाटील तसेच शारदा वैदू पाटील हे देखील नियमितपणे भगवान केदारनाथांचे दर्शन घेतात. केवळ दर्शनापुरतीच त्यांची यात्रा मर्यादित न राहता मंदिरासाठी काहीतरी कायमस्वरूपी योगदान द्यावे, अशी भावना त्यांच्या मनात होती.
याच भावनेतून त्यांनी यंदा मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर बसविण्यासाठी “जय श्री केदार” असा आकर्षक एक किलो चांदीचा नामफलक अर्पण करण्याचा संकल्प केला. हा नामफलक विशेष रितीने पोतदार ज्वेलर्स येथे तयार करण्यात आला. उत्कृष्ट कारागिरी आणि भक्तिभाव यांचा संगम असलेला हा नामफलक मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे.
नामफलक तयार झाल्यानंतर समाजसेवक सुजित मुळगुंद यांच्या उपस्थितीत त्याची खरेदी करण्यात आली. त्यानंतर केदारनाथ येथे जाऊन मंदिराचे मुख्य प्रभारी अधिकारी विपीन तिवारी तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजय कपरुवान यांच्याकडे तो विधिवत सुपूर्द करण्यात आला. मंदिर प्रशासनाने पाटील कुटुंबाच्या या भक्तिपूर्ण योगदानाचे स्वागत करत त्यांचे कौतुक केले.

आजच्या काळात अनेक जण धार्मिक स्थळांना भेट देतात; मात्र त्या पवित्र स्थळाच्या जतनासाठी आणि विकासासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याचे उदाहरण फार कमी पाहायला मिळते. कंग्राळीच्या पाटील कुटुंबाने केलेली ही देणगी केवळ आर्थिक मूल्याची नसून ती श्रद्धा, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक मानली जात आहे.
या उपक्रमामुळे परिसरातही पाटील कुटुंबाचे अभिनंदन होत असून, त्यांच्या या सेवाभावी कृतीतून इतर भाविकांनाही धार्मिक स्थळांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळत आहे.




