बेळगाव लाईव्ह : अथणी तालुक्यातील कटगेरी गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत शोभा परगोंड सारवाड (रा. मूळ खवटखोप, ता. अथणी) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी पती परगोंड याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, शोभा आणि परगोंड हे मूळचे अथणी तालुक्यातील खवटखोप गावचे रहिवासी असून, गेल्या काही काळापासून रोजगारानिमित्त अवजीकर मठात वास्तव्यास होते. शोभा या मठात स्वयंपाकाचे काम करत होत्या, तर परगोंड चालक म्हणून कार्यरत होता.
पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद आणि पत्नीबाबत संशयाच्या कारणावरून वारंवार भांडणे होत होती. याच संशयातून पतीने पत्नी झोपेत असताना धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कटगेरी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.




