Saturday, June 15, 2024

/

काँग्रेस हा आता देशातील नाकारलेला पक्ष -प्रल्हाद जोशी

 belgaum

काँग्रेस हा खोटी आश्वासने देणारा खोटे बोलणारा खोटारडा पक्ष आहे. देशातील कोणत्याही राज्यात सत्तेवर नसलेला हा पक्ष कर्नाटकातून देखील लवकरच वजा होईल. थोडक्यात काँग्रेस पक्ष हा सध्याच्या घडीला देशातील ‘नाकारलेला पक्ष’ बनला आहे, अशी परखड टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

बेळगाव येथे आज शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेस हा सध्याच्या घडीला देशातील नाकारलेला राजकीय पक्ष बनला आहे. तुम्ही देशातील कोणतेही राज्य घ्या, काँग्रेस तेथे सत्तेवर नाही. येत्या काळात छत्तीसगड व राज्यस्थान येथूनही काँग्रेस हद्दपार होणार असल्याचे सर्वेक्षण सांगते. एकंदर आता काँग्रेस पक्ष ‘झिरो’ झाला आहे. कर्नाटकातूनही तो लवकरच वजा होईल.

काँग्रेस पक्ष फक्त खोटी आश्वासन देतो. आजपर्यंत हा पक्ष खोटं बोलतच आला आहे. घरोघरी जाऊन गॅस सिलेंडरसाठी 500 रुपये देतो, जीएसटी नुकसान भरपाई 500 रुपये देतो, पीक नुकसान भरपाई देतो अशी आश्वासने ते देत असतात. जनतेचा आपल्यावरील विश्वास उडाल्याचे लक्षात आल्यामुळेच आता ते ‘गॅरंटी कार्ड’ देत आहेत. आता ही गॅरंटी देण्याचे कारण म्हणजे यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची त्यांनी कधीच पूर्तता केलेली नाही. राजस्थानमध्ये काँग्रेसने सांगितले होते की सत्तेवर आल्यास कर्जावरील व्याज माफ केले जाईल. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. छत्तीसगड येथे त्यांनी बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप तेथील बेरोजगारांना भत्ता मिळालेला नाही. हिमाचल प्रदेशमध्ये देखील त्यांनी हेच आश्वासन दिले होते. मात्र परवाच जाहीर झालेल्या तेथील अर्थसंकल्पात बेरोजगार भत्त्याचा उल्लेखही नाही.

 belgaum

या पद्धतीने कर्नाटकात देखील त्यांच्या आश्वासनांच्या पूर्ततेची शाश्वती नाही. त्यासाठीच गॅरंटी कार्डचा अवलंब करून काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मात्र जनता काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे असे सांगून यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या डबल इंजिन सरकारने बेळगावसह राज्यात विविध विकास कामांच्या माध्यमातून उत्तम कामगिरी बजावली आहे.

त्यामुळे यावेळीही कर्नाटकात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार निर्विवाद थेट बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेवटी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.