Saturday, April 20, 2024

/

महाराष्ट्रातील नेत्यांकडून कार्यभाग साधण्याचा राष्ट्रीय पक्षांचा प्रयत्न : दीपक दळवी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी राजकारण सुरु आहे. सीमाभागात मोठ्या प्रमाणात मराठी मते असल्याने हि मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्ष मराठी जनतेच्या भावनांशी खेळ करत असून सध्या राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून जोरदार घमासान सुरु आहे. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने संपर्क साधला असता त्यांनी या राजकारणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राजहंसगडावर भाजप आणि काँग्रेसकडून दोनवेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्याचा गोंधळ घालण्यात येत आहे. याआधी २ मार्च रोजी शासकीय कार्यक्रम दाखवून भाजप नेत्यांनी शिवमूर्तीचे अनावरण केले. आता पुन्हा उद्या या मूर्तीचा अनावरण सोहळा काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नेते आणि अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांना आमंत्रित करण्यात आले. अमोल कोल्हे यांना सीमाप्रश्नाची जाण आहे, त्यामुळे झालेल्या गोंधळानंतर त्यांनी आपला बेळगाव दौरा रद्द करून महाराष्ट्र बाणा दाखविला, याबद्दल त्यांचे आपण अभिनंदन करत असल्याचे दळवी म्हणाले.

महाराष्ट्रातील नेत्यांना बोलवून सीमाभागातील मराठी भाषिकांवर दबाव आणण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचा आटापिटा सुरु आहे. येथील मराठी भाषिक महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास ठेवतात यासाठी त्यांना आमंत्रित करून येथील राजकारणी आणि राष्ट्रीय पक्ष कार्यभाग साधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच प्रेम जर मराठी जनता आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर असेल तर सीमाभागात राष्ट्रीय पक्षांनी निवडणूकच लढवू नये, असा रोखठोख मुद्दा दीपक दळवी यांनी मांडला. सीमाभागात आपण राज्य करण्यासाठी नव्हे तर आमच्या हक्कांसाठी निवडणूक लढवीत आहोत आणि सीमाभाग हा मराठी जनतेचा आहे, हे दर्शविण्यासाठी आपण हा लढा शेवटपर्यंत घेऊन जाणार, आणि सीमाभागात लढणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

ज्यावेळी सीमाभागात अधिवेशन घेण्यात येते त्यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव केला जातो, टोलनाक्यावर वाहने अडवून प्रवेशबंदी केली जाते, अटक केली जाते आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका जवळ आल्या कि याच महाराष्ट्रातील नेत्यांसाठी पायघडया घातल्या जातात, हि कर्नाटकाची दुटप्पी वागणूक असल्याचे ते म्हणाले. आजवर आपल्यावर अनेक केस दाखल झाल्या, सीमालढ्यात अनेक त्रास सहन करावे लागले. महाराष्ट्रावर असलेले सीमावासीयांचे प्रेम आणि भावना जाणून महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात येऊ नये, आणि जर यायचेच असेल तर ते केवळ मराठी भाषिक आणि सीमाप्रश्नासाठी यावे, सीमाप्रश्न कसा पुढे जाईल याकडे लक्ष द्यावे, असेही ठाम व्यक्त त्यांनी व्यक्त केले.

Deepak dalvi
Deepak dalvi

राजहंसगडावरील रविवारच्या कार्यक्रमासाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्यतिरिक्त आमदार बंटी पाटील, संभाजीराजे आणि रितेश देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे रितेश देशमुख यांनी सीमाभागात अशा कार्यक्रमासाठी पाऊल ठेवू नये, याशिवाय बंटी पाटील यांना इत्यंभूत परिस्थितीची जाणीव आहे, आणि संभाजी राजे यांनी केवळ वारस म्हणून याठिकाणी येणे टाळून महाराष्ट्र बाणा जपावा, खडसावून या कार्यक्रमाला विरोध दर्शवावा, असे आवाहनदेखील दीपक दळवी यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरून सीमाभागात सुरु असलेले राष्ट्रीय पक्षांचे राजकारण हे गलिच्छ पातळीवर सुरु असून महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभूत करण्यासाठी आणि मराठी जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व राजकारण सुरु असल्याचे मत दीपक दळवी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.