बेळगाव लाईव्ह : शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात खिडकीचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला आहे.
यादरम्यान खिडकीचा लोखंडी दरवाजा, गंगाळ आणि इन्व्हर्टर मात्र लांबविण्यात आले आहे. याप्रकरणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मंगळवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या मंदिरात तैनात करण्यात आलेले वॉचमन आणि पुजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी लागलीच ही बाब ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या निदर्शनात आणून दिली.
मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर रात्री ११.५२ च्या सुमारास खिडकीचा लोखंडी दरवाजा तोडून चोराने मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून आले. यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा तोडण्याचाही प्रयत्न चोराने केला असून या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला आहे.
खिडकीतून आत शिरलेल्या चोराने दानपेटीही फोडण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील किंमती ऐवज लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या चोराने मंदिरातील पितळी गंगाळ आणि २ इन्व्हर्टर यासह लोखंडी दरवाजा असे एकूण अंदाजे ६५००० रुपये किमतीचे साहित्य लांबविले आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.