Saturday, December 7, 2024

/

प्रांताधिकारी उशिरा आल्याने रिंगरोडची सुनावणी पुन्हा लांबणीवर; शेतकऱ्यातून संताप

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनींसाठी शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदविले असून यावर प्रांताधिकारी सुनावणी करणार होते. मात्र सलग दुसऱ्यांदा रिंगरोडविरोधात नोंदवलेल्या आक्षेपांवर सुनावणीसाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

बुधवारी होणारी वाघवडे आणि बाची येथील शेतकऱ्यांची सुनावणी प्रांताधिकारी उशिरा आल्यामुळे बारगळली. यावेळी संतप्त समिती नेते आणि शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांना चांगलेच खडसावले. माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तुम्ही साहेब असाल, पण शेतकऱ्यांना दुसरी कामे नाहीत का? असा रोखठोख सवाल केला. सुनावणीसाठी वेळेवर येऊनही शेतकऱ्यांना दोन तास ताटकळत थांबावे लागले. शेतकऱ्यांनाही बरीच कामे असतात. याचे भान ठेवण्याचा सल्ला किणेकर यांनी दिला. यावेळी आपण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी म. ए. समिती नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी रिंगरोडविरोधात आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अखेर १२.४५ च्या दरम्यान आलेल्या प्रांताधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. प्रांताधिकाऱ्यांवर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आणि समिती नेत्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी शेतकरी आणि समिती नेत्यांसमोर नमते घेऊन शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार बुधवारी होणारी सुनावणी पुढे ढकलली. तसेच असा प्रकार पुन्हा होणार नाही अशी ग्वाही देत प्रांताधिकाऱ्यांनि माफीही मागितली.

यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, ऍड.
सुधीर चव्हाण, एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, कृष्णा हुंदरे, सुनील अष्टेकर, दत्ता उघाडे, रामचंद्र मोदगेकर, भागोजी पाटील, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. शाम पाटील, ऍड. प्रसाद सडेकर, यल्लाप्पा सावंत, सचिन बाळेकुंद्री, पुंडलिक पावशे यांच्यासह वाघवडे आणि बाची येथील शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.