बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गांजा व अफीम विक्रीसह अन्य गैरप्रकारांना तात्काळ घालावा. तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण फौजदारी गुन्हे नोंदवू नयेत, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या सहकार्याने उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी शहर पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांना सादर करण्यात आले. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी शहरातील गांजा व अफीम या अंमली पदार्थांची वाढती विक्री तसेच वाढलेले अन्य गैरप्रकार आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती याबाबत पोलीस आयुक्तांची चर्चा करून माहिती दिली. निवेदनाचा स्वीकार करून पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव शहराच्या दक्षिण भागात गांजा व अफीम या अंमली पदार्थांच्या विक्रीला ऊत आला आहे. त्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होऊन शैक्षणिक कारकीर्द व उज्वल भवितव्यसह स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. सदर प्रकाराची गंभीर दखल घेण्याऐवजी संबंधित भागातील पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही.
उलट श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर विनाकारण फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. तेंव्हा या संदर्भात त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्तान जोरदार आंदोलन छेडून मोर्चा काढण्याद्वारे जाहीर निषेध नोंदवेल, अशा आशयाचा तपशील श्रीराम सेना हिंदुस्तानच्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी गांजा प्रकरणातील मुलांना अटक करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी आमची मागणी नव्हती असे सांगून गांजा पकडल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंदवून पकडलेल्यांना अटक का करण्यात आली नाही? सदर घटनेची माहिती त्वरित आपल्या वरिष्ठांना का कळवण्यात आली नाही? यावरून सदर गांजा प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या मुलांचा हात नसून त्या भागाच्या सीपीआय आणि संबंधित पोलीस कॉन्स्टेबल्स या सर्वांचा हात आहे, असा आरोप कोंडुसकर यांनी केला.
गांजा विकणाऱ्यांपेक्षा त्यांना सोडणारे पोलीस अधिकारी या प्रकरणात मोठे दोषी आहेत. त्यांच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे. सध्या पोलीस दलातील कांही भ्रष्ट अधिकारी जनतेचे रक्षक नव्हे तर भक्षक झाले आहेत. हे निवडक पोलीस अधिकारी कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या वरदहस्ताखाली मनमानी करत आहेत. अशा अधिकाऱ्यांना बेळगावात थारा न देता त्यांची कारागृहात रवानगी करावी, अशी विनंती आपण पोलीस आयुक्तांना केली असल्याचेही रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.
याप्रसंगी वकील मंडळींसह उमेश कुऱ्याळकर भरत पाटील, नंदू इंदलकर, नारू निलजकर, सुहास चौगुले, राजेंद्र बैलूर, राहुल अवणे, सावंत, महेश मजूकर आदींसह श्रीराम सेना हिंदुस्तानचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.