वरेरकर नाट्यसंघ, लोकमान्य ग्रंथालय, सरस्वती वाचनालय, वांग्मय चर्चा मंडळ आणि मंथन कल्चरल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मराठी लाॅग आउट होतीय?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिसंवादात आजच्या तरुणाईला आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे.
टिळकवाडी येथील वरेकर नाट्य संघाच्या सभागृहात सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादामध्ये आजच्या युवा पिढीला मत व्यक्त करण्याची संधी दिली जाणार असल्यामुळे मराठी भाषे समोरील आव्हाने कोणती? आणि त्यांचा सामना कशा प्रकारे करता येईल? यासंबंधी नव तरुणांना काय वाटते? भाषेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे? हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि अन्य भाषांच्या लाटेच्या प्रभावात मातृभाषा मराठीचे संवर्धन कसे करायचे? समाज माध्यमांचा आपल्या भाषेवर इष्ट -अनिष्ट काय परिणाम होतो? याबद्दल आजच्या युवा पिढीचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
सदर कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रे तरुणाईच्या हाती देण्यात येणार आहेत. अंकिता कदम, चिन्मय शेंडे, मैथिली कपिलेश्वरकर, चार्टर्ड अकाउंटंट पुष्कर ओगले, रणजीत चौगुले, डॉ. सरिता मोटराचे (गुरव), कंपनी सेक्रेटरी सुधीर सुतार आणि वैभव लोकूर हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे नियंत्रक म्हणून प्रसाद प्रभू काम पाहतील.
कार्यक्रमाचे स्वरूप शक्यतो अनौपचारिक ठेवण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून वक्त्यांना आणि श्रोत्यांनाही उत्स्फूर्त सहभाग घेता येईल. प्रश्नोत्तरातून कार्यक्रम पुढे सरकावा असा प्रयत्न असेल. तरी सर्व मराठी प्रेमी बंधू-भगिनींनी या कार्यक्रमात जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.