इंदोर येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव -2023 मध्ये कर्नाटक फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत शहर परिसरातील दोघा युवा होतकरू फुटबॉलपटूंनी स्वतःसह बेळगावचे नांव उज्वल केले आहे.

पदवीपूर्व द्वितीय वर्षात शिकत असलेला बेळगाव तालुक्यातील कडोली गावचा निवृत्ती सुनील पावनोजी (वय 18) आणि लिंगराज महाविद्यालयात पदवीपूर्व प्रथम वर्षात शिकत असलेला शहरातील सोहम संदीप ओऊळकर (वय 18) हे दोघे फुटबॉलपटू सध्या खेलो इंडिया राष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.
या यशामुळे पुरुषांच्या भारतीय फुटबॉल संघात म्हणजे फुटबॉल खेळात देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या त्यांच्या संधी उंचावल्या आहेत. निवृत्ती आणि सोहम हे दोघेही वयाच्या 10 व्या वर्षापासून फुटबॉल खेळत असून त्यांनी आतापर्यंत बेळगाव आणि बेंगलोर येथील विविध संघांचे प्रतिनिधित्व करत आपली चमक दाखविली आहे. सध्या ते शहरातील बेळगाव युनायटेड फुटबॉल अकॅडमी (पीयुएफए) संघातमधून खेळत आहेत. त्यांना फुटबॉल प्रशिक्षक मतीन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
निवृत्ती आणि सोहम या दोघांनीही गेल्या 15 जानेवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित राज्य संघाच्या निवड चांचणी शिबिरात हजेरी लावताना कर्नाटक संघाच्या आघाडीच्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर बेंगलोर येथेच आयोजित 20 दिवसाच्या फुटबॉल प्रशिक्षक झेवियर यांच्या मार्गदर्शनाखालील प्रशिक्षण शिबिरानंतर या दोघांना कर्नाटकच्या अंतिम संघामध्ये स्थान मिळाले.
सोहम ओऊळकर हा गोलरक्षक असून निवृत्ती पावनोजी हा संघाचा मधल्या फळीतील खेळाडू आहे. खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेमध्ये कर्नाटक संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावताना पश्चिम बंगाल, ओडिसा, मेघालय आणि पंजाब या संघांना पराभूत केले आहे.