belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये जितकी चढाओढ नाही तितकी चढाओढ विद्यमान ग्रामीण आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल जेव्हापासून लागली आहे तेव्हापासूनच जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर राजकारण तापले आहे. उभयतांतील आरोप-प्रत्यारोप हे जनतेसाठी काही नवे नाहीत. मात्र, विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे उभयतातील परस्पर विरोधी राजकारण, टीकाटिप्पणण्यांना ऊत आला असून सध्या ग्रामीण मतदार संघात सुरु असलेल्या भेटवस्तूचे वाटपावरून उभयतांत चांगलीच जुंपली आहे.

bg

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण मतदार संघातील राजकारण आतापासूनच तापत चालले असून विविध ठिकाणी विविध उपक्रम, मेळावे, सभा, कार्यक्रमांचे भव्य आयोजन होत चालले आहे. आज सुळेभावी या भागात रमेश जारकीहोळी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यमान ग्रामीण आमदारांविरोधात रमेश जारकीहोळी यांनी घणाघाती टीकाटिप्पण्या करत आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.

विद्यमान ग्रामीण आमदारांकडून ग्रामीण मतदार संघात आकर्षक भेटवस्तू वाटपाचा सपाटा सुरु करण्यात आला आहे. कुकर, डबे यासारख्या भेटवस्तू वाटपावरून रमेश जारकीहोळी यांनी विद्यमान ग्रामीण आमदारांची खिल्ली उडवत या भेटवस्तूंवर कमीतकमी १००० रुपये खर्च होत असतील, असे सांगितले. निवडणूक होईपर्यंत आणखी काही भेटवस्तू गृहीत धरून हा आकडा वाढून ३००० पर्यंत जाईल, मात्र आपण दुप्पट पैसे खर्च करायला तयार असून आगामी निवडणुकीत विद्यमान ग्रामीण आमदारांना पराभूत नक्की करणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भेटवस्तू दिल्यानंतर २-३ दिवस जनता लक्षात ठेवते मात्र आज आपण कोणतीही भेटवस्तू न देता आपल्यासाठी इतकी गर्दी जमली, एकाठिकाणी कुकर-मिक्सरचे वाटप होत असूनही त्या गोष्टीला लाथाडून जनता आपल्या मेळाव्यासाठी जमली हे आपले पुण्य असल्याचे जारकीहोळी म्हणाले. आजतागायत आपण ६ वेळा निवडणूक जिंकली मात्र आजपर्यंत आपण कधीच पैसे खर्च करून निवडणूक जिंकली नाही. याउलट जनतेनेच आपल्यासाठी कष्ट घेऊन निवडणुकीत विजयी केले. असे ते म्हणाले.Ramesh jarkiholi

ग्रामीण भागात मागील निवडणुकीपासून आतापर्यंत रस्त्याचा विकास झाला नाही. मात्र रस्त्यांवरील पब, बार आणि क्लबचा मात्र विकास झाला. ग्रामीण भागाचे हे दुर्दैव पाहता लक्ष्मी देवीलाच साकडे घालून विधानसभा निवडणुकीत विद्यमान ग्रामीण आमदारांच्या पराभवाची मागणी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. इतकेच नव्हे तर विद्यमान ग्रामीण आमदारांच्या पेहरावाबाबतही टीका करत ५ वर्षांपूर्वी आणि ५ वर्षानंतर त्यांच्यात झालेला बदल आणि या बदलासाठी जनतेच्या पैशाचा झालेला चुराडा याबाबतही त्यांनी खोचक टीका केली. विद्यमान ग्रामीण आमदार या निवडणुकीसाठी जितका पैसे खर्च करतील त्यापेक्षा अधिक दहा कोटी आपण खर्च करू, पण ग्रामीण मतदार संघ आपण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आपल्याला मंत्रिपद मिळो अथवा न मिळो, आपण राज्यात पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकावणार असून बेळगाव जिल्ह्यात सध्या १३ जागांवर भाजपाची सत्ता आहे मात्र आगामी निवडणुकीत १४ जागांवर भाजपचेच वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.