Thursday, March 28, 2024

/

बुडाचा घोटाळा उघडकीस येईपर्यंत निरंतर आंदोलन -कागणीकर

 belgaum

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने अर्थात बुडाच्या कथीत 150 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची सखोल चौकशी करून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम आदमी पक्षासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचा लढा निरंतर सुरूच राहील, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी स्पष्ट केले.

बुडाच्या कथीत 150 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई या आपल्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने आज सोमवारपासून आपले नेते राजू टोपण्णावर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला आहे. या सत्याग्रहाला शेतकऱ्यांसह शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सत्याग्रहाच्या ठिकाणी शिवाजी कागणीकर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बेळगाव शहराच्या विकासाच्या नावाखाली बुडाने तालुक्यातील लहान शेतकऱ्यांच्या शहरानजीकच्या 15 -20 गुंठे सुपीक पिकाऊ जमिनी संपादन केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना बाजूला सारून खरा विकास कोणाचा होतोय? त्या शेतजमिनींमध्ये भूखंड (प्लॉट) कशासाठी पडले जात आहेत? हा मोठा प्रश्न आहे, असे कागणीकर म्हणाले.Kaganikar

 belgaum

जे भाडोत्री घरात राहतात. स्वतःच्या मालकीचे घर असावे असे ज्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ज्या सर्वसामान्य लोकांनी बुडाकडे पैसे भरून भूखंडाची अपेक्षा केली आहे त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यासाठीच बुडामध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्यासंदर्भात कोणती कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे हा भ्रष्टाचार जोपर्यंत उघडकीस येत नाही. त्यात जे कोण कोण सामील आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम आदमी पक्षाने आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटना आपला लढा निरंतर सुरूच ठेवतील, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी शेवटी सांगितले.

अन्य एका आंदोलनकर्त्याने कणबर्गी येथील बुडाच्या निवासी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 65 एकर जमीन बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप केला. तसेच या जमीन खरेदी प्रक्रियेत सब रजिस्ट्रार आणि तहसीलदार यांनी अवैध कागदपत्रे तयार केली असून ती कागदपत्रे तात्काळ रद्द करावीत. त्याचप्रमाणे बुडाचा 150 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा उघडकीस आणून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्याने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.