Friday, July 19, 2024

/

कर्नाटकी दडपशाहीविरोधात शिनोळीत आंदोलन; दोन तासाहून अधिक काळ रास्ता रोको

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने आयोजिण्यात आलेल्या महामेळाव्यापूर्वीच कर्नाटक पोलिसांनी मराठी नेत्यांचे अटकसत्र सुरु केल्याने संतप्त सीमावासीय मराठी भाषिकांनी शिनोळी येथे उग्र आंदोलन छेडले.

गेल्या दोन तासाहून अधिक काळ येथील वाहतूक ठप्प झाली असून जोवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची सुटका केली जात नाही तोवर रास्ता रोको करण्यात येईल, अशी ठाम भूमिका मराठी भाषिक आंदोलकांनी घेतली आहे. याठिकाणी पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र नेत्यांच्या सुटकेशिवाय आपण याठिकाणाहून हलणार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार असो, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, नही चलेगी-नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून गेला होता. शिनोळी सीमेवर समिती नेते तसेच चंदगड भागातील नेत्यांनी कार्यकर्त्यांसमवेत ठिय्या मांडल्याने या भागातील वाहतूक गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली आहे.

अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलिसांनी धाव घेत समिती नेत्यांना अटक केली. याठिकाणी १४४ कलम जारी करून कोणत्याही परिस्थितीत महामेळावा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र प्रशासन आणि पोलिसांच्या या आडमुठ्या धोरणावरून संतप्त झालेल्या सीमावासीयांनी शिनोळी येथे जाऊन आंदोलन छेडले. समिती नेते मदन बामणे, आर. एम. चौगुले, सुनील अष्टेकर, माजी मंत्री भरमू पाटील, प्रभाकर खांडेकर, दुदाप्पा बागेवाडी आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेत पोलिसांसमोर ठाम भूमिका घेत रस्ता अडवला.Shinoli

पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. मात्र कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून गेले दोन तास रस्त्यावर ठिय्या मांडून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली आहे. आंदोलन ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत सीमावासीयांना पाठिंबा दर्शविला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत रीतसर सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

मात्र आजवर कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानता आपलेच तुणतुणे वाजवणे पसंत केले आहे आणि याचीच पुनरावृत्ती सदर बैठकीनंतर पुन्हा कर्नाटकाने केली असल्याचे जगजाहीर झाले आहे. सकाळी अटक केलेल्या समिती नेत्यांना जोवर सोडण्यात येत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील किंबहुना ते अधिक तीव्र होईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.