Thursday, April 25, 2024

/

मराठा समाज आरक्षणासाठी 20 रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव

 belgaum

कर्नाटकात मराठा समाजाला 3 -बी मधून 2 -ए मध्ये आरक्षण मिळावे या मागणीच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा फेडरेशन आणि सकल मराठा समाज यांच्यातर्फे सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येत्या मंगळवार दि 20 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौधला घेराव घालून आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी दिली.

शहरातील हॉटेल मिलन येथे आज रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. किरण जाधव म्हणाले की, मराठा समाजाचे स्वामीजी परमपूज्य मंजुनाथ स्वामीजी, श्यामसुंदर गायकवाड आदींसह कर्नाटकातील अनेक आजी-माजी आमदार व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठा समाजाला 3 -बी मधून 2 -ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष करत आहोत कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे.

त्यासाठी बेळगावात उद्यापासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान येत्या 20 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौधला घेराव करण्यात येणार असून या आंदोलनात बेळगाव शहराज्यभरातील 25 हजारहून अधिक मराठा समाज बांधव सहभागी होतील अशी अपेक्षा आहे, असे जाधव यांनी सांगितले.

 belgaum

सदर आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलन स्थळी पार्किंग, शामियाना, खानपान आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर आमचे आंदोलन सुरू असताना मराठा समाजाचे आमदार विधानसौध सभागृहात आवाज उठवतील आणि मुख्यमंत्र्यांना आमच्या भेटीसाठी बाहेर घेऊन येतील.

त्यावेळी आम्ही आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडणार आहोत. तेंव्हा बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटकातील समस्त मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन किरण जाधव यांनी केले.

शंकराप्पा आयोगाच्या शिफारशीनुसार वाल्मिकी समाजाला जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळाले पाहिजे. तेंव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार कसे होत नसेल तर किमान 2 -ए मध्ये तरी मराठा समाजाला आरक्षण दिले जावे. कारण हा समाज आर्थिक, शैक्षणिक वगैरे दृष्ट्या खूपच मागासलेला आहे.Kiran jadhav

यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले, कर्नाटक सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शंकराप्पा आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी शिफारस सरकारकडे केली आहे. आरक्षण मागणी संदर्भात आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.येडीयुरप्पा यांनीही ४ वर्षांपूर्वी आपल्या मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही सदर मागणी पूर्ण झालेली नाही.

त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणी साठी हिवाळी अधिवेशनादरम्यान येत्या मंगळवारी सुवर्णसौध समोर समस्त मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे आमदार एकत्र येऊन विधानसभेत आरक्षणाची प्रमुख मागणी मांडणार आहेत असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजयुवा नेते  विनय कदम यांनी आरक्षण मागणी मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाचे आंदोलन निरंतर सुरू राहील असा इशारा दिला. यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष वैभव कदम, युवा नेते धनंजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर, राज्य कार्यदर्शी विठ्ठल वाघमोडे,झंगरुचे, गणपत पाटील, संजय पाटील,बंडू कुद्रेमणीकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.