Thursday, April 25, 2024

/

कायदा सुव्यवस्थेसह शांतता राखणे साऱ्यांचे कर्तव्य -एडीजीपी

 belgaum

कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादा संदर्भात सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देईपर्यंत बेळगावसह सीमा भागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखणं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोक कुमार यांनी केले.

शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिके व इतर कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बेळगावात सर्व भाषिकांनी शांततेने राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे. उच्च स्तरावर काय चालले आहे ते चालू दे आपण सर्वांनी गावात शांतता राखली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत सर्वांनी सामंजस्याने सीमा भागात शांतता राखावी असे आवाहन केले आहे. त्यानुसार जनता म्हणून आपण सर्वांनी शांतता राखली पाहिजे. उगाचच इकडे तिकडे बसेसवर दगडफेक करणे, त्यांना काळे फासने यासारखे गैरप्रकार दोन्ही बाजूने होऊ नयेत, असे एडीजीपी आलोक कुमार सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यावर बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी समितीची जी आंदोलनं किंवा मेळावा असतो तो येथील मराठी भाषिकांच्या न्याय हक्काची कर्नाटक सरकार जी पायमल्ली करतय त्यासाठी आणि भाषिक अल्पसंख्यांक म्हणून आमचे जे अधिकार आहेत ते सरकारने व प्रशासनाने आम्हाला द्यावेत त्यासाठी असतो असे सांगितले.

 belgaum

बेळगाव असो किंवा अन्यत्र कोठेही आम्ही प्रक्षोभक असे काहींही करत नाही. आम्ही फक्त घटनेने दिलेले आमचे अधिकार मागतो. जे आमचा आहे ते आम्हाला मिळावं यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही लढा देत आहोत. कर्नाटक सरकारच्या कायद्यानुसार आम्हाला जे मिळायला हवं ते दिलं जात नाही. कर्नाटक सरकार कासारगोडमधील कन्नडीगांसाठी केरळ सरकारकडून कांही गोष्टी मागून घेतय. तशाच कांही गोष्टी त्यांनी आम्हा मराठी भाषिकांना दिल्या तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असे स्पष्ट केले.Mes krv police meet

तेंव्हा आता आपणच उच्च स्तरावर यासंदर्भात चर्चा घडवून आणावी. आजपर्यंत आमच्या मध्ये कन्नड -मराठी असे कधीही भांडण झाले नाही. जो काही वाद होतो तो पोलीस विरुद्ध करवे किंवा पोलीस विरुद्ध म. ए. समिती असा होतो. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कन्नड मराठी कार्यकर्त्यांमध्ये कधीच हमरातुमरी अथवा मोठी हाणामारी झालेली नाही. तेंव्हा तुम्हीच उच्चस्तरावर सरकार आणि प्रशासनाला मराठी भाषिकांशी सहकार्य करण्याची विनंती करा अशी विनंती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एडीजीपी आलोक कुमार यांना केली.

याप्रसंगी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रप्पा, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी, मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर,जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, तालुका म. ए. समितीचे सचिव ॲड. एम. जी. पाटील, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील तसेच कन्नड रक्षण वेदिके आणि अन्य कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.