Friday, March 29, 2024

/

समितीचे सकल मराठा संयोजक दिलीप पाटील, धैर्यशील मानेना निमंत्रण

 belgaum

बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे येत्या सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्यास आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीला पाठवून सीमावासियांचा आवाज बुलंद करावा, अशी विनंती मध्यवर्तीय म. ए. समितीतर्फे महाराष्ट्राचे सकल मराठा संयोजक दिलीप पाटील, आणि तज्ञ समितीचे अध्यक्ष  खासदार धैर्यशील माने यांना  एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश अन्यायाने म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) डांबण्यात आला. हा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी येथील मराठी भाषिक जनता गेली 66 वर्षे विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. सत्याग्रह, मोर्चे, धरणे, उपोषणे, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या भेटीगाठी अशा विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. अनेक वेळा प्रयत्न करूनही प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. महाराष्ट्राने दावा दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी एका खाजगी संस्थेच्या जागेत 2006 पासून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध बांधून आपला हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मराठी जनतेवर विविध तऱ्हेने अन्याय चालू केला आहे. मराठी भाषेत कोणतेही कागदपत्र न देणे, वेगवेगळ्या कारणास्तव कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य अंधकारमय करणे, महाराष्ट्रीय नेत्यांना बेळगावात येण्यास प्रतिबंध करणे इत्यादी गोष्टी कर्नाटक सरकार करीत आहे.

महाराष्ट्र सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. बेळगाव जवळील सुवर्ण सौधमध्ये ज्यावेळी कर्नाटक सरकार अधिवेशन घेते. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेळगावात मराठी जनतेच्या मेळाव्याचे आयोजन करून महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली जाते. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी यापूर्वी या मेळाव्याला हजेरी लावली आहे.Adhiveshan mahamelava

 belgaum

पहिल्या वर्षी सन 2006 साली कै. आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य बेळगाव हजर होते. त्यानंतर सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे असे महाराष्ट्रातील नेत्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. येत्या 19 डिसेंबर 2022 ला बेळगावात कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. त्या दिवशीच्या मेळाव्यास आपण किंवा आपल्या संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित राहून सीमावासियांचा आवाज बुलंद करावा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे, असा तपशील सकल मराठा संयोजक महाराष्ट्र राज्य दिलीप पाटील यांना धाडलेल्या पत्रामध्ये नमूद आहे. या पत्रावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निमंत्रण स्वीकारल्याचे स्पष्ट करताना सकल मराठा संयोजक मराठा महाराष्ट्र राज्य दिलीप पाटील यांनी ‘कानडी धमक्यांना न भिता टक्कर फक्त मराठाच देऊ शकतो. ह्या विश्वासाने सीमा भागातील मराठी बांधवांनी 19 तारखेला अधिवेशनाला मराठ्यांना साद घातली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठेवून कितीही अडथळे आणू देत जिगरबाज मराठ्यांच्या बरोबर बेळगावला जाणारच,’ असे एका संदेशाद्वारे सोशल मीडियावर मराठा संघर्ष दिलीप पाटील यांनी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.