Friday, July 19, 2024

/

बॅनरबाजीतून इच्छुकांची फिल्डिंग!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील हिवाळी अधिवेशन हे विधिमंडळ कामकाजापेक्षा एखादी ‘पिकनिक’ किंवा ‘इव्हेन्ट’ असल्याचे नेहमीच निदर्शनात येत आहे. बेळगावमध्ये भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून विविध मंत्री, अधिकारी बेळगावमध्ये दाखल होतात. मात्र विधिमंडळ अधिवेशन नेहमीच गोंधळाच्या वातावरणात पार पडत असल्याचे बेळगावकर अनुभवत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आकाशात हेलीकॉप्टरचा दुमदुमणारा आवाज, शहरात चारी बाजूनी सरकारी बाबूंची वाहने, गजबजलेली हॉटेल्स आणि त्यातच भर म्हणजे राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि राजकारणात बढती मिळवू पाहणाऱ्या आजी-माजी आणि भावी राजकारणायची बॅनरबाजी!

एकीकडे स्मार्टसिटी, स्मार्ट सिटीमधील अर्धवट कामे, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत केलेली वरकरणी, तात्पुरती डागडुजी, शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावावर करण्यात आलेला भकास विकास आणि चारीबाजूंनी या विकासावर पांघरून घातल्याप्रमाणे झळकणारे बॅनर! सध्या बेळगावची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. शहरांतर्गत प्रत्येक चौकाचौकात, पथदीप, दुभाजक, रस्त्याचे कोपरे आणि ज्याज्याठिकाणी जागा रिकाम्या आहेत, त्या त्या ठिकाणी बॅनरमुळे बेळगाव झाकोळले गेले आहे.

सध्या विधानसभा निवणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. अवघ्या ४-५ महिन्याच्या अंतरावर असलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची तसेच पद-उमेदवारी यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंघोषित राजकारण्यांची मोठी चलती दिसत आहे. आपल्याला ज्या मतदार संघात निवडणूक लढवायची आहे त्या मतदार संघात चारीबाजूनी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

स्वागत कमानीमुळे अनेक ठिकाणी चौकाचे-रस्त्याचे नाव कळेनासे झाले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिवास्वप्ने पाहणाऱ्या इच्छुकांची सध्या बेळगावमध्ये मांदियाळी झाली आहे. भावी नेते होण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा, मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या ढीगभर बातम्या हि बाब कमी होती म्हणून कि काय आता बॅनरबाजीने बेळगावकर हैराण झाले आहेत. कित्येक बॅनर हास्यास्पद असल्याचे आढळून आले आहे.

२०१७ साली बॅनरबाजीवर लगाम लावण्यासाठी विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांनी आक्षेप घेतला होता. तसेच तातडीने सदर बॅनर हटविण्याचा आदेशही दिला होता. मनपाला दिलेल्या आदेशानुसार तातडीने बॅनर हटविण्यातही आले होते. परंतु यंदा पुन्हा बॅनरबाजीचे पेव फुटले असून यासाठी मनपाकडून परवानगी घेण्यात आली आहे? याबाबत चौकशी केली असता विनापरवाना बॅनर उभारण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विनापरवाना उभारण्यात आलेल्या बॅनरवर, स्वागतकमानीवर कारवाई होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तोवर बेळगावकरांना नव्या राजकारण्यांची ओळख बॅनरच्या माध्यमातून मात्र नक्कीच होईल, यात शंका नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.