Sunday, April 28, 2024

/

निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधींना आला “मराठी”चा पुळका!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना ‘लक्ष्य’ करण्यासाठीही केविलवाणी धडपड सुरु झाली आहे. गेल्या साडेचार वर्षात मराठीचा किंचितही विचार न आलेल्या ताई आणि साहेबाना निवडणुकीच्या तोंडावर मात्र मराठीचा भलताच पुळका आला आहे.

सीमाभागात सत्तेवर यायचे असल्यास मराठी माणसाचा पाठिंबा सर्वात महत्वाचा आहे. मात्र याच मराठी माणसाचा वापर केवळ निवडणुकीच्या दरम्यान करणारे स्वार्थी राजकारणीदेखील आपल्या बेळगावमध्ये आहेत. भावनिक प्रश्न असलेल्या गोष्टीवर दबाव घालून आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आतापासूनच बेळगावमधील विविध मतदारसंघातील नेते मंडळी मराठीचा जयजयकार करू लागले आहेत. विकासकामांचे फलक असोत किंवा शुभेच्छांचे फलक.. आपल्या कार्यालयीन वेबसाईटवरदेखील आता मराठीला प्राधान्य दिले जात आहे, ही कुतूहलाची गोष्ट वाटत आहे.

गेल्या साडेचार वर्षात मराठी माणसाचा यत्किंचितही विचार न करता सत्ता गाजवलेल्या लोकप्रतिनिधींना आत्ताच का इतके मराठी प्रेम उफाळून येत आहे? याचा विचार मराठी माणसाने करणे गरजेचे आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर लादण्यात येणारी सक्ती, मराठी भाषिकांना देण्यात येणारी दुजाभावाची वागणूक, होणारे अन्याय आणि यादरम्यान मूग गिळून गप्प असणारे लोकप्रतिनिधी यांचे समीकरण हे नेहमीचेच झाले आहे. मात्र निवडणुका जवळ आल्या कि विकास आणि मराठीवरील प्रेमाचे गाजर दाखवून मराठी भाषिकांना भुलवण्याचे काम नेहमीच लोकप्रतिनिधी करत असतात.

 belgaum

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावमधील मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आतापासूनच मराठी वरील प्रेमाची ‘कर-नाटकी’ झलक दाखवत आहेत. अनेक ठिकाणी वाटली जाणारी शुभेच्छापत्रे, शुभेच्छा फलक, विकासकामांची माहिती, भाषणे आणि इतकंच नाही तर चक्क फेसबुक पेजीस देखील मराठीमध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

मराठी भाषिकांना मराठीवरील प्रेम दाखवून निवडणुकीपुरते आकर्षित करण्याचा हा नेहमीचा लोकप्रतिनिधींचा डाव मराठी भाषिकांनी वेळीच ओळखून आपल्या अस्मितेसाठी जागरूक होऊन, वेळीच सावध होणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.