Thursday, October 10, 2024

/

शेट्टर आणि हेब्बाळकर यांना यासाठी नाकारतील बेळगावकर ?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. व्यासपीठ, जाहीर प्रचार, मतदारांच्या गाठीभेटी हे सर्व वातावरण सध्या देशवासीय अनुभवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजूनही राष्ट्रीय पक्ष नाराज इच्छुकांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या, राज्याच्या राजकारणापासून वेगळ्या धोरणावर लढवली जाणारी बेळगावमधील निवडणूक सध्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेणारी ठरत असून बेळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीमुळे यंदाच्या निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघात उपरा विरुद्ध भूमिपुत्र हा मुद्दा गाजत आहे. जगदीश शेट्टर हे मूळचे धारवाड – हुबळीचे आहेत. त्यामुळे बाहेरून आलेला आणि लादला गेलेला उमेदवार असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे. जगदीश शेट्टर यांची राजकीय कारकीर्द तशी मोठी आहे.

कर्नाटक विधानसभेवर अनेकवेळा धारवाड विधानसभा मतदार संघातून त्यांची वर्णी लागली आहे. तर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शेट्टरांनी भूषविले आहे. मात्र या निवडणुकीत शेट्टरांना धारवाड सोडून बेळगावला यावं लागलं. तत्कालीन रेल्वेराज्यमंत्री, माजी खासदार दिवंगत सुरेश अंगडी आणि सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला देण्यात आलेली उमेदवारी, पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांच्या गळ्यात पडलेली विजयश्रीची माळ आणि आता त्यांचेच व्याही असणारे जगदीश शेट्टर यांना भाजपाची देण्यात आलेली उमेदवारी यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांसह भाजप समर्थक कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. घराणेशाहीला नकार देणाऱ्या भाजपकडूनच जगदीश शेट्टर यांच्यासारख्या उमेदवाराला संधी देण्यात आली, यामुळे बेळगावच्या राजकारणाची दिशा सध्यातरी स्पष्ट नसल्याचेच चित्र आहे.

हुबळी – धारवाडशी बेळगावचे नेहमीच वैरत्व आहे. अनेक नेतेमंडळींनी बेळगावला येणारे विविध महत्वपूर्ण प्रकल्प हुबळी – धारवाडला हलविले, परस्पर हस्तांतरित केले असा आरोप विविध पक्षांकडून केला जातो. याबाबतीत बेळगाववर नेहमीच दुजाभाव केला जातो आणि अन्यायही होतो. बेळगाव विविध महत्वपूर्ण गोष्टींमध्ये पिछाडीवर पडण्यासाठी हुबळी – धारवाडच्या सिंहाचा वाटा आहे असा आरोपही बेळगावकरांकडून केला जातो. गेल्या काही वर्षात बेळगाव विमानतळाच्या काही योजना हुबळी विमानतळाला मागे सारून पुढच्या श्रेणीत आले होते. मात्र केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह हुबळी धारवाडच्या अनेक नेत्यांनी बेळगावचा हा प्रकल्प हुबळीला पळविला असा आरोप झाला. बेळगाव विमानतळाचे खच्चीकरण झाल्यामुळे येथे होणाऱ्या अनेक प्रकल्पांची कामे रखडली. उडाण योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळाचे नाव सर्वोच्च यादीत आले होते. मात्र राजकीय स्वार्थासाठी हुबळी धारवाडच्या नेत्यांनी बेळगावच्या विकासातील तोंडचा घास हिसकावून घेतल्याने बेळगावची सर्वांगीण प्रगती ठप्प झाली. आय आय टी (iit) स्थापित करण्यासाठी एक पर्याय बेळगाव होता मात्र बेळगावमध्ये यासर्व पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कारण पुढे करून त्यावेळी तो आय आय टी स्थापना धारवाड ला नेण्यात आली.Shetter Mrinal

या शिवाय अनेक औद्योगिक प्रकल्प हुबळी धारवाडकडे वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आले होते सध्या बेळगावच्या राजकारणातील चर्चेत आलेला विषय याच अर्थाने अधिक रंगत आहे. जगदीश शेट्टर हेदेखील हुबळी धारवाडचे असल्याने बेळगावला ते न्याय देऊ शकणार नाहीत, बेळगावचा विकास साधू शकणार नाहीत, आपल्या गृहस्थानालाच ते अधिक प्राधान्य देतील आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी बेळगावचा वापर करतील, असा आरोप होत आहे.या सगळ्याची निगेटिव्हिटी घेऊनच शेट्टर यांना पुढे प्रचारासाठी जावे लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून उमेदवारी मिळविलेले मृणाल हेब्बाळकर यांचेही बेळगावसाठी अद्याप कोणतेच योगदान लाभले नाही. केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मृणाल हेब्बाळकर यांना उमेदवारी दिली गेल्याची चर्चा रंगत आहे. याचप्रमाणे बेळगावसह संपूर्ण राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण मानले जाणारे जारकीहोळी कुटुंब, विद्यमान बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी, गेल्या कित्येक दशकांपासून निपाणीवर अधिराज्य गाजविणारे जोल्ले कुटुंब या सर्वांना केवळ घराणेशाहीतूनच उमेदवारी मिळाली असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. एकीकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीपुरते मिळणारे महत्व, आणि निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केवळ सतरंज्या उचलणे, पताका लावणे आणि घोषणा देणे याव्यतिरिक्त कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचे न मिळणारे महत्व या सर्व बाजू पाहता राजकारणात येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी केवळ चातकाप्रमाणेच वाट पाहायची का? असे अगतिक प्रश्न उपस्थित होत आहे.

घराणेशाहीतूनच उमेदवारी पुढे रेटली गेली तर इच्छुकांनी राजकारणात कधी प्रवेश घ्यायचा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात तर रंगतच आहे. शिवाय सोशल मीडियावरदेखील उपरा उमेदवार, घराणेशाहीच्या माध्यमातून राजकीय नशीब आजमावत असलेला आणि अनुभवाने कमी असलेला उमेदवार हा ट्रेंड रंगत आहे. आगामी निवडणुकीत जनता डोळसपणे आपला नेता निवडेल कि केवळ देशपातळीवरील राजकारणाला अनुसरून प्रवाहासोबत जाणे पसंत करेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.