Friday, May 24, 2024

/

ताठ मानेचा, निष्ठावंत कार्यकर्ता!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : राजकारणात नेतृत्वाला जी किंमत असते ती केवळ कार्यकर्त्यांमुळे सिद्ध होते. नेतृत्वाला पुढे करून जनतेपर्यंत पोहोचविण्यात खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचा वाटा मोलाचा असतो.

आणि जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ताच नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करतो त्यावेळी जनतेच्या अंतर्मनातील सर्व गोष्टी आरशाप्रमाणे स्पष्ट होतात आणि राजकारण केवळ सत्ता आणि खुर्चीचे पाईक न होता ते समाजकारणाच्या आणि लोकहिताच्या दृष्टीने उदयाला येते. या साऱ्या व्याख्या सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविणाऱ्या महादेव पाटील यांच्यासाठी लागू होतात.

गेल्या ६७ वर्षाच्या सीमालढ्याच्या कार्यकाळात आपल्या आयुष्याची उभी हयात समितीशी एकनिष्ठ राहणाऱ्या आणि आजवर कोणत्याही पदावर कार्यरत नसलेल्या महादेव पाटील यांना समितीच्या निवड कमिटीने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला हि बाब खरोखरच उल्लेखनीय आहे.

 belgaum

आजवर समितीच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या महादेव पाटील यांनी लाठ्या – काठ्या झेलुनही मागे पाऊल घेतले नाही. राजकारणात उतरायचं असेल मोठ्या आर्थिक पार्श्वभूमीची गरज असते, असा समज आहे. मात्र हा समज महादेव पाटील यांच्याबाबत लागू होत नाही.

महादेव पाटील हे पूर्वीपासून छायाचित्रकार म्हणून काम पाहात आले आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील महादेव पाटील यांनी आजवर अनेक लहान मोठे व्यवसाय हाताळले. पण हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात किंचितही स्वतःला बाजूला ठेवले नाही.Mahadev patil

समितीच्या आंदोलनात, मोर्चात, लढ्यात उतरणाऱ्या मराठी भाषिकांना मोर्चाच्या अग्रभागी राहून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून घोषणा देत वातावरण निर्मिती केली. लढ्याचे स्वरूप काय आहे, कसे आहे, मराठी भाषिकांची भूमिका कशी असावी याबाबत प्रत्येक आंदोलनात त्यांनी मराठी भाषिकांना दिशा दाखवली. आपल्या खणखणीत आवाजात नेहमीच लक्षवेधी घोषणा देण्यासाठी हरहुन्नरीने पुढाकार घेणारे महादेव पाटील आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा चेहरा म्हणून सीमावासीयांसमोर उभे आहेत.

महादेव पाटील आजदेखील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच समितीत सक्रिय आहेत. शहापूर येथील बॅ. नाथ पै चौक येथे महादेव पाटील यांचे चहाचे दुकान आहे. गेल्या ५१ वर्षात सीमाभागात झालेल्या आंदोलनात त्यांनी ज्या पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला आहे, त्यांची बोलण्याची एकंदर शैली, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे या त्यांच्या स्वभाव गुणधर्मामुळे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे उत्तम संबंध आहेत.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झालेल्या संघर्षात ज्यापद्धतीने त्यांनी ५१ वर्षांची तपश्चर्या केली आता त्याच तपश्चर्येचे फळ महादेव पाटील यांच्या माध्यमातून सीमावासीयांना मिळेल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. मतांच्या स्वरूपात आशीर्वाद मागण्यासाठी जनतेच्या दरबारात उतरलेल्या महादेव पाटील यांना नक्कीच सीमाबांधव सहकार्य करतील, यात तिळमात्र शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.