बेळगाव लाईव्ह:हल्याळ (जि. कारवार) येथील के.एल.एस. पदवी पूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गौरी रावजी पाटील हिने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवताना सर्वाधिक 96.02 टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम येण्याबरोबरच विज्ञान शाखेत हल्ल्याळ तालुक्यासह कारवार जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुळची येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी असलेली गौरी पाटील हिने जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण, गणितामध्ये 100 पैकी 99 गुण, भौतिक शास्त्र व रसायन शास्त्र विषयात प्रत्येकी 100 पैकी 98 गुण, इंग्रजीमध्ये 100 पैकी 93 गुण, तर हिंदीमध्ये 100 पैकी 88 गुण संपादन केले आहेत. आपल्या महाविद्यालयासह कारवार जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गौरी रावजी पाटील हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
यापूर्वी मिलाग्रिस इंग्रजी माध्यमिक विद्यालय हल्याळ या शाळेची विद्यार्थीनी असताना गौरी पाटील हिने दहावीच्या परीक्षेत सुध्दा 99.04 टक्के (625 पैकी 619 गुण) गुणांनी उत्तीर्ण होत कारवार जिल्हा व हल्याळ तालुक्यात प्रथम येत घवघवीत यश मिळविले होते. बारावी परीक्षेतील आपल्या यशाबद्दल बोलताना गौरी रावजी पाटील म्हणाली की, दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने नियोजनपूर्वक अभ्यास केल्यामुळे मला यशाचे शिखर गाठता आले. नियोजनपूर्वक आराखडा आणि वेळापत्रक तयार करून घेऊन अभ्यास केल्यास परीक्षेत यशाचे शिखर गाठता येते. मनात जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कोणतेही यश गाठायला अधिक वेळ लागत नाही.
प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवून नियमित अभ्यास केल्यास कोणताही विषय अजिबात जड जात नाही. त्यामुळे यश मिळायला वेळ लागत नाही. थोडक्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर प्रयत्न केल्याशिवाय यश नाही असे गौरीने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर समाज सुधारक, महामानवांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन तसेच माझे आई – वडील, गुरुजन आणि नातेवाईक, समाजातील मान्यवर मोठी मंडळी यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेत यापुढे मी जीवनात यशस्वी होण्यासाठी वाटचाल करणार आहे, असे तिने सांगितले
गौरी रावजी पाटील ही मुळची येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी असून अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते रावजी पाटील व भारती पाटील यांची कन्या आहे. तिला प्राचार्या अनुप्रिया मॅडम , प्राचार्य विशाल करंबळकर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. बारावी परीक्षेतील घवघवीत कशाबद्दल तिचे गौरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.