Tuesday, April 30, 2024

/

खानापूर मधून समितीचे राष्ट्रीय पक्षांना चॅलेंज! दिला युवा उमेदवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष: प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समितीने लढवलीच पाहिजे असा आवाज नेहमीच बेळगाव लाईव्हने उचलून धरला होता.याबाबत नेहमीच भूमिका देखील मांडली होती, त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समितीने स्वीकारलेल्या भूमिकेला प्रतिसाद मिळत असून केवळ बेळगावच नव्हे तर आता कारवार लोकसभा मतदारसंघाच्या रणांगणात देखील महाराष्ट्र एकीकरण समिती उतरली आहे.

मराठी बहुल असणारा कारवार लोकसभेचा मतदार संघ आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीने पहिल्या काही वर्षांचा अपवाद वगळता राष्ट्रीय पक्षांना बहाल केला होता, मात्र स्वतःची व्होट बँक सांभाळण्यासाठी मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बरोबर करवार लोकसभा मतदारसंघातदेखील उमेदवार देण्याचे ठरवले आहे.

एकूण मतसंख्येच्या जवळपास 40% मराठी भाषिक असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांचे राजकीय प्राबल्य असूनही समितीच्या उदासीनतेमुळे हा मतदारसंघ मराठी लढ्याच्या दृष्टीने कोरडाच ठेवण्यात आला होता. यात काही लोकांची आर्थिक गणिते लपली होती त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी त्यांनी हा मतदारसंघ असाच राष्ट्रीय पक्षांच्या दिमतीला दिला होता ,परंतु धडाडीचे सळसळते रक्त असणारे खानापूर मतदारसंघातील निरंजन सरदेसाई यांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास आले. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने आग्रहाने ही निवडणूक लढवण्याचे ठरवले.

 belgaum

युवा कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांना राजकीय वारसा निश्चितच लाभलेला आहे. त्यांचे काका निळकंठराव सरदेसाई यांनी खानापूरची आमदारकी भूषवली होती त्याचबरोबर त्यांचे वडील उदयसिंह सरदेसाई राजकीय दृष्ट्या प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. सुसंस्कृत, साहित्यिकदृष्ट्या जाणता माणूस म्हणून त्यांची साहित्य क्षेत्रात ही ओळख होती. उदयसिंह सरदेसाई यांचा खानापुरातील विशेष वर्गात दबदबा आहे.अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत असत, तोच वारसा निरंजन सरदेसाई यांनी पुढे चालविला आहे.

शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून निरंजन सरदेसाई यांची ओळख आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ते इच्छुक असूनही त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे तिकीट मिळाले नाही. तरीही कोणताही मनात किंतु न ठेवता त्यांनी हिरीहिरीने प्रचारात भाग घेतला. एकंदर त्यांना त्या प्रचार दौऱ्यात लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा मनसुबा जाहीर केला.Niranjan sardesai

खानापूर तालुक्यातील अनेक दिग्गजानी विरोध करूनही सरदेसाई यांनी जिद्दीने निवडणूक लढवण्याचे ठरवले. महाराष्ट्र एकीकरण समितीने निरंजन सरदेसाई नावाच्या युवकाच्या नावावर शिकाकमोर्तब करून नक्कीच राष्ट्रीय पक्षांना एक तगडे आव्हान आव्हान उभे केले आहे.

कारवार लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीच्या रिंगणात नव्हती त्यामुळे तेथील राजकीय गणितं वेगळी होती, मात्र समिती या रिंगणात उतरल्याने राजकीय फासे नक्कीच बदलणार आहेत, कारण मराठी माणसाचा टक्का आपल्या न्याय हक्कासाठी समितीच्या पाठीमागे जाणार आहे आणि हे धोरण राष्ट्रीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे .आता राष्ट्रीय पक्ष मराठी माणसाचे लांगुलचालन करणार परंतु गेली कित्येक वर्ष मराठी माणसाने आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार सहन केला आहे. त्याचबरोबर खानापूर तालुक्याला कधीही उमेदवारीची लॉटरी पक्षाकडून लागली नाही. मात्र समिती नेतृत्वाने यंदा निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देत खानापूर तालुक्याची इच्छाशक्ती व्यक्त केली आहे.Mes karwar

या सर्व पार्श्वभूमीवर खानापुरातून लोकसभेला होणार मतदान आणि एकंदर मतदारसंघातील मराठी माणसाची लोकसंख्या पाहता समितीची ताकद नक्कीच वाढणार आहे. याशिवाय खानापूर विधानसभा मतदारसंघात देखील आगामी विधानसभेत मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख दावेदार असणार आहे.
काँग्रेस तर्फे माजी आमदार अंजलीताई निंबाळकर व भाजपा तर्फे विश्वेश्वर हेगडे मैदानात आहेत. काँग्रेस व भाजपचे दोन्ही उमेदवार हे लोकसभेसाठी पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत. त्यामुळे ही लढत समितीलाही बरोबरीची ठरत आहे.

समिती कार्यकर्ते, नेते यांनी एकजूट दाखवत प्रचाराचा धमाका उडवला तर राष्ट्रीय पक्षांना धूळ चारत समिती विजय उत्सव साजरा करू शकते हे सत्य काळाच्या उदरात दडले आहे. याची जाणीव समितीनिष्ठानी करून घेणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा व मतदान प्रक्रिया समितीने राबवली तर मराठी माणसाच्या एकत्रीकरणाबरोबरच मराठी माणसाचा विजयही होऊ शकतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.